मिरज जंक्शन आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार, मनोज सिन्हा यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 05:40 PM2018-02-23T17:40:57+5:302018-02-23T17:40:57+5:30
देशातील प्राचीन रेल्वे स्टेशनमध्ये मिरज जंक्शनचा समावेश आहे. हे जंक्शन ए श्रेणीत असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार असल्याचे रेल्वे व दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले.
सांगली : देशातील प्राचीन रेल्वे स्टेशनमध्ये मिरज जंक्शनचा समावेश आहे. हे जंक्शन ए श्रेणीत असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार असल्याचे रेल्वे व दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले. रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलात ५० टक्के महिला पोलिसांची भरती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येथील वालचंद महाविद्यालयाच्या आवारात आयोजित सांगली फर्स्ट या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मंत्री सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिन्हा म्हणाले की, देशातील काही रेल्वे स्टेशन्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यात मिरजेचा समावेश आहे. २५ हजारांपेक्षा जागा प्रवाशांची रेलचेल असलेल्या स्टेशनचा विकास करण्यावर आम्ही भर दिला आहे. अॅक्सिलेटर लिफ्ट, वायफाय, सीसीटीव्ही या सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे. रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात टाळण्यासाठीही उपाययोजना केल्या आहेत. यात्रेकरूची सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे.
रेल्वेत महिलांची छेडछाड, विनयभंग, चो-या यावर बोलताना ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम त्या राज्यातील सरकारचे आहे. रेल्वे विभागाकडे स्वतंत्र पोलीस दल आहे. शासन, रेल्वे विभाग व सुरक्षा दल यांनी एकत्रित काम करून अशा कृत्यांना पायबंद घालावा. रेल्वेत महिलांची छेडछाड व इतर प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात ५० टक्के महिलांचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे. भाजपा सरकारच्या कामाचा पाढा वाचत सिन्हा म्हणाले की, यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी एक लाख ४७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेती विकासासाठी १४ लाख कोटी, शेतीमालाला दीडपट भाव, २२ हजार अत्याधुनिक भाजी मंडई उभारण्याचा संकल्प सोडला आहे. रेल्वे विभागाला अंदाजपत्रकात एक लाख ३८ कोटीची तरतूद केली आहे. देशातील दहा हजार कुटुंबांना आयुष्यमान भव योजनेतून औषधोपचरासाठी ५ लाखांपर्यंतची मदत केली जाणार आहे. १८ हजार खेड्यात वीज पोहोचू शकलेली नाही. त्यांच्यासाठी सौभाग्य योजना जाहीर केली. यातील १५ हजार ३६८ घरात वीज पोहोचली आहे. तर चार कोटी कुटुंबांना सौभाग्य योजनेतून मोफत वीज देण्यात येणार आहे. उज्ज्वला योजनेतून ५ कोटी महिलांना गॅस दिल्याचेही ते म्हणाले.
पुणे-मिरज दुहेरीकरण २०२१ पर्यंत पूर्ण करणार
पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला सुरेश प्रभू मंत्री असताना मंजुरी मिळाली. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे. दुहेरीकरणाचे काम २०२१पर्यंत पूर्ण केले जाणार असून, त्यासाठी २४३६ कोटींची तरतूद केली आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर विद्युतीकरणासाठी ५६६ कोटींचा निधी दिला आहे. दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर आणखी जादा रेल्वे गाड्या सोडल्या जातील. क-हाड-चिपळूण रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम जिंदाल कंपनीकडून सुरू असल्याचे मंत्री सिन्हा यांनी सांगितले.