मुंबई महापालिकेत गैरव्यवहार

By Admin | Published: March 17, 2016 12:44 AM2016-03-17T00:44:23+5:302016-03-17T00:44:23+5:30

मुंबई महापालिकेत नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीच्या कामात कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

The misconduct in the Mumbai Municipal Corporation | मुंबई महापालिकेत गैरव्यवहार

मुंबई महापालिकेत गैरव्यवहार

googlenewsNext

मुंबई : मुंबई महापालिकेत नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीच्या कामात कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास सक्षम असल्याचे सांगत, एसआयटी चौकशीची विरोधकांची मागणी फेटाळून लावली. यामुळे संतप्त विरोधकांनी घोषणाबाजी करत, सभागृहाचे कामकाज बंद पाडले.
मुंबई महापालिकेत नालेसफाई, रस्तेदुरुस्ती, भूलयंत्रांची खरेदी, सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती, डेब्रिज विल्हेवाट आदी कामात भ्रष्टाचार होत आहे. पालिका आयुक्तांनी केलेल्या चौकशी अहवालातूनही भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, सत्ताधाऱ्यांकडून घोटाळा दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसचे शरद रणपीसे, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आदी विरोधकांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केला.
यावर उत्तर देताना, काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करत, प्रत्येक तक्रारींची चौकशी झाली असून, काही प्रकरणांची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. नालेसफाईतील गैरकारभाराबाबत पालिकेच्या १४ अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तर नालेसफाईच्या ३२ कंत्राटांशी संबंधित सर्व ठेकेदारांवर ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाणे व आर्थिक गुन्हे विभागाकडे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरप्रकार सुरू आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचाराची एसआयटी किंवा अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्यामार्फत चौकशीची मागणी विरोधकांनी केली. (प्रतिनिधी)

टॅब खरेदीत भ्रष्टाचार नाही
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या टॅब खरेदीत भ्रष्टाचार अथवा गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या लेखी उत्तरात दिले.

Web Title: The misconduct in the Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.