केंद्र, राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल
By admin | Published: December 28, 2015 04:07 AM2015-12-28T04:07:34+5:302015-12-28T04:07:34+5:30
राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपा-शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे़
लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपा-शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे़ ही जनतेची दिशाभूल असल्याचे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले़
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या २१व्या राज्य अधिवेशनाला रविवारी अहमदपूरमध्ये प्रारंभ झाला़ आंबेडकर म्हणाले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सरकारमध्ये सहभागी आहेत़ पण ते सरकारवर टीका करतात़ भाजपाचे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नसल्याचे ते सांगतात़ सरकारने काहीच केले नाही, असे त्यांचे मत असेल तर ते त्यांच्या मंत्र्यांना राजीनामा देण्यास का सांगत नाहीत? भाजपा व सेनेची मिलीभगत असून, ते एकमेकांवर आरोप करून जनतेला फसवत आहेत़
किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुलकुमार अंजान म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी धैर्य सोडू नये़ जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना कायमचे हद्दपार करावे़ मागच्या दोन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे़ भाजपा-सेनेच्या काळात लोकांना पिण्यास पाणी मिळत नाही़ वाईनचा मात्र जागोजागी महापूर दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)