आजच्या शहीद दिनाबाबत तरुणाईची दिशाभूल
By admin | Published: March 23, 2016 02:14 AM2016-03-23T02:14:07+5:302016-03-23T02:14:07+5:30
१४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेम दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्यांना याच दिवशी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना फाशी दिले गेले
ठाणे : १४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेम दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्यांना याच दिवशी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना फाशी दिले गेले व आज ‘शहीद दिन’ असल्याचे संदेश व्हाटस्अॅपवर फिरवून दिशाभूल केली गेली. मात्र खराखुरा ‘शहीद दिन’ उद्या २३ मार्च रोजी असून सोशल मीडियांवरील अफवांची धूळवड आम्हा युवा पिढीची दिशाभूल करीत असल्याची खंत काही युवक-युवतींनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
उद्या होळीखेरीज आणखी काय आहे, असा सवाल ‘लोकमत’च्या कॉलेज कट्टा वार्ताहरांनी युवांना केला. त्यावेळी फारच थोड्यांना ‘शहीद दिन’ असल्याचे सांगता आले. काहींच्या मनात ‘शहीद दिन’ १४ फेब्रुवारीस आहे की २३ मार्चला याबाबत संभ्रम होता. काहींनी ‘शहीद दिन’ हा १४ फेब्रुवारीसच आहे, असा छातीठोक दावाही केला.
ज्यांनी उत्तर अचूक दिले ते म्हणाले की, व्हॉटसअॅपवर एखादा संदेश आल्यावर आम्ही त्याची खातरजमा करून पाहतो. त्याखेरीज तो फॉरवर्ड करीत नाही. स्मार्ट फोनमुळे हे सहज शक्य आहे. युवा पिढीला विकीपीडिया हे ज्ञानाचे भांडार वाटत असून व्हॉटसअॅपवरील माहिती हा खजिना ठरला आहे. फेसबुक हे मन मोकळे करण्याची ‘कन्फेशन बॉक्स’ वाटू लागली आहे. त्यामुळे बरेचदा कुठलीही खातरजमा न करता किंवा मूळ ग्रंथ किंवा कागदपत्रे न वाचता सरधोपट विधाने करणे किंवा व्यक्त होण्याचे प्रकार घडतात. स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा आम्हाला अभिमान असल्याची भावना व्यक्त करतानाच भविष्यात केवळ व्हॉटसअॅपवर निर्भर राहणार नाही, असे युवक-युवतींनी मान्य केले. (कॉलेज कट्टा वार्ताहर)
भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना २३ मार्च रोजी फाशी देण्यात आली होती. त्यामुळे तोच दिवस ‘शहीद दिन’ आहे हे माहित होते. मात्र १४ फेब्रुवारीला ‘शहीद दिन’ असल्याचे सांगून सोशल मीडियावर चुकीची माहिती फिरवली जात होती.
- योगेश विसपुते
जुन्या पिढीला वाटतं की युवा पिढी शहीदांना विसरली आहे, परंतु तसे नसून, त्यांचे विचार समाजात रुजवण्याचे काम युवकच करतो आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू देहाने जरी आमच्यात नसले तरी त्यांच्या बलिदानाची जाणीव आम्हाला आहे. मात्र शहीद दिनाबाबत संभ्रम निर्माण केला गेला हे खरे
- नितेश गावकर
१४ फेब्रुवारीला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तीन क्रांतीकारकांना फाशी दिल्याचा मेसेज मी वाचला होता. मात्र तो कोणाला फॉरवर्ड केला नाही. कारण त्याबाबत साशंक होतो. कॅलेण्डरमध्ये २३ मार्चला ‘शहीद दिन’ असल्याची नोंद आहे, पण त्याकडे आमचे लक्षच गेले नाही. त्यादिवशी फक्त होळी आहे इतकेच माहित होते. - आकाश शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय
१४ फेब्रुवारीलाच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली या मेसेजवर माझा पूर्ण विश्वास आहे. हा मेसेज मी फेसबुकवर शेअर केला होता. एकीकडे हा‘ शहीददिन’ असताना भारतात व्हॅलेण्टाईन डे साजरा केला जातो, याची खंत मला नेहमीच आहे. २३ मार्च रोजी तीन क्रांतीकारकांना फाशी दिले याबाबत मी अनभिज्ञ आहे. उद्या केवळ होळी असल्याची माहिती आहे. - रेमोना क्रास्तो, ज्ञानसाधना महाविद्यालय