‘मिस कॉल’ सदस्यांचा भाजपाला विसर
By admin | Published: April 19, 2016 04:30 AM2016-04-19T04:30:10+5:302016-04-19T04:30:10+5:30
तब्बल १० कोटी सदस्यांची नोंदणी करून जगभरातील सर्वच राजकीय पक्षांचे सदस्य नोंदणीचे विक्रम मोडीत काढणाऱ्या भाजपाला बिहारबरोबरच काही राज्यांतील स्थानिक
अनिकेत घमंडी, डोंबिवली (ठाणे)
तब्बल १० कोटी सदस्यांची नोंदणी करून जगभरातील सर्वच राजकीय पक्षांचे सदस्य नोंदणीचे विक्रम मोडीत काढणाऱ्या भाजपाला बिहारबरोबरच काही राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभवाचा फटका बसल्याने आता आपल्या सदस्यांची शोधाशोध पक्षाने सुरू केली आहे.
‘मिस कॉल’ देऊन पक्षसदस्य बनलेल्या बहुतांश मंडळींना प्रत्यक्ष भेटण्याचा विसर भाजपाला पडल्याने हे हवशे-गवशे कमळाला मत देण्याचे विसरून गेले, असे आता पक्षाच्या निदर्शनास आले आहे. या ‘मिस कॉल’ घोळाची मंगळवारी दिल्लीत झाडाझडती घेतली जाणार आहे. देशभरात नोव्हेंबरमध्ये महाजनसंपर्क अभियान राबवले गेले. त्याअंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका, शहर, गावस्तरावर सदस्य नोंदणी करण्यात आली. मंत्री, नेते, उपनेते, पदाधिकारी आदींना सदस्य नोंदणीचे लक्ष्य दिले होते. त्यामुळे भाजपाची मंडळी मिस कॉल देऊन सदस्य होण्याचा आग्रह धरीत होती. त्या लोकांना गाठून त्यांना पक्षकार्यात आणण्याची जबाबदारी मात्र विसरल्याचे काही निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. विशेषत: बिहार निकालानंतर ही बाब चर्चेत आली होती. मात्र, आता ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभव पदरी आल्यावर या सदस्य नोंदणीचे बिंग फुटले.
> 1 लाख लोक भाजपाचे सदस्य ठाणे जिल्ह्यातच मिस कॉल देऊन झाले. मात्र, प्रत्यक्षात त्यापैकी ९५ हजार व्यक्तींशी गेल्या वर्षभरात पक्षाचा संपर्क झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
> भाजपाने महाराष्ट्रात
१ कोटी सदस्य संख्येचे लक्ष्य निश्चित केले होते व ते साध्य करण्यात यश मिळवले होते. नवीन सदस्यांसोबत वरचेवर संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरूच असते. सदस्य नोंदणीबाबत दिल्लीत बोलवलेल्या बैठकीसंबंधी आपल्याला काहीही भाष्य करायचे नाही. - रवींद्र भुसारी,
संघटनमंत्री, प्रदेश भाजपा