पश्चिम रेल्वेची प्रवाशांसाठी मिस्ड कॉल अलर्ट सुविधा
By admin | Published: April 26, 2016 02:30 AM2016-04-26T02:30:32+5:302016-04-26T02:30:32+5:30
मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेकडूनही ‘मिस्ड कॉल अलर्ट सुविधा’ सुरू करण्यात आली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेकडूनही ‘मिस्ड कॉल अलर्ट सुविधा’ सुरू करण्यात आली आहे. या सुविधेप्रमाणे उपलब्ध केलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास प्रवाशांना लोकलची स्थितीची माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर अनेक वेळा तांत्रिक बिघाड होत असतात आणि त्याचा फटका लोकल सेवेला बसतो. यामुळे लोकल गाड्या लेट धावत असल्याने प्रवाशांना एखादा ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो व प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. प्रवाशांचे हाल थांबावेत आणि त्यांना प्रत्येक दिवशी लोकलची सद्य:स्थिती समजावी यासाठी पश्चिम रेल्वेने मिस्ड कॉल सुविधा सुरू केली आहे.
यासाठी प्रवाशांना १८00२१२४५0२ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. दोन वेळा फोन वाजल्यानंतर तो बंद होईल आणि त्वरित प्रवाशाच्या मोबाइलवर लोकलच्या स्थितीची माहिती देणारा एसएमएस येईल. लोकलमध्ये किंवा रेल्वेमार्गावर एखादा तांत्रिक बिघाड लोकल किती उशिराने धावत आहेत, बिघाड
दुरुस्त होण्यास लागणारा वेळ याची माहिती संक्षिप्त स्वरूपात दिली जाईल. तसेच एखाद्या विशिष्ट ट्रेनची माहितीही या सेवेद्वारे मिळेल. मात्र मोठा बिघाड नसेल किंवा लोकल अवघे पाच मिनिटे उशिराने धावत असतील तर त्याबाबतची माहिती मिळणार नाही. (प्रतिनिधी)