‘पीक-पाहणी’चा गायब कॉलम कळीचा मुद्दा
By admin | Published: July 13, 2017 01:03 AM2017-07-13T01:03:52+5:302017-07-13T01:03:52+5:30
आॅनलाईन सात-बारातील त्रुटी : जिल्ह्यातील ९८.०२ टक्के काम पूर्ण : चावडी वाचनावेळी वादावादीचे प्रकार
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आॅनलाईन सात-बारामध्ये पीक पाहणीचा ‘क्रमांक १५’चा रद्द केलेला कॉलमच कळीचा मुद्दा बनला आहे. चावडी वाचनामुळे हा प्रकार समोर आला आहे. हा ‘कॉलम’ गायब झाल्याने सात-बारावर कुळांची नावेच येत नसल्याने शासकीय अधिकारी व संबंधितांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. नाव, आडनावांत बदल, खरेदीच्या चुकीच्या नोंदी अशा अन्य त्रुटीही या आॅनलाईन सात-बारात असून, दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १० लाख ३५ हजार ८८२ सात-बाराचे संगणकीकरण झाले असून, याचे प्रमाण ९८.०२ टक्के आहे.
जिल्ह्यात सात-बारा आॅनलाईनच्या माध्यमातून देण्याच्या कामाला एप्रिल २०१६ पासून सुरुवात झाली. जिल्ह्यात २० एप्रिलपासून हस्तलिखित सातबारे देणे बंद करण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच आॅनलाईन सातबारा हा विषय वादाचा आणि चर्चेचा राहिला आहे. कारण ग्रामीण भागात काही भागांत रेंजची अडचण व सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे वेळेवर नागरिकांना सात-बारा उतारे देण्यास वेळ लागत होता.
त्यामुळे तलाठ्यांनी अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर करण्याबाबत विनंती केली होती; परंतु अद्यापही सॉफ्टवेअरमधील त्रुटी आढळत आहेत. आॅनलाईन सातबारामध्ये नावे गायब होणे, नाव व आडनावांमध्ये फरक पडणे, खरेदीच्या नोंदीमध्ये विकणाऱ्याचेही नाव तसेच राहणे, सातबारा ‘८-अ’च्या नोंदी अनेक ठिकाणी राहणे, जमीन क्षेत्र कमी दिसणे अशा त्रुटींमुळे नागरिक, शेतकऱ्यांना अडचण होत आहे. त्यातील कळीचा मुद्दा म्हणजे पूर्वी हस्तलिखित सातबारामध्ये असणारा पीक-पाहणी (१५ क्रमांक)चा कॉलम या आॅनलाईन सातबारातून वगळण्यात आला आहे. हा कॉलमच नसल्याने यामधील कुळांची म्हणजे जमीन कसणाऱ्यांची नावे ही या नवीन सातबारावर दिसत नाहीत. ही बाब १५ मेपासून ३० जूनपर्यंत सुरू राहिलेल्या चावडी वाचनामधून समोर आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शासकीय कर्मचारी व शेतकऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले आहेत. सन १९४९ पासून आतापर्यंत हस्तलिखित सातबारावर या कुळांची नावे होती; परंतु आता अचानक ही नावे आॅनलाईन सातबारावरून गायब झाल्याने शेतकरीवर्ग प्रचंड अस्वस्थ व संतप्त असल्याचे दिसत आहे. ही त्रुटी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
आॅनलाईन सात-बारामधून ‘क्रमांक १५’चा कॉलमच वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे शेती कसणाऱ्या कुळांची नावे दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. ही त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन व शासनपातळीवर प्रयत्न करू; परंतु जर जाणीवपूर्वक जर हा ‘कॉलम’ रद्द केला असेल तर शेतकऱ्यांचे जनआंदोलन उभे करून शासनाला याबाबत फेरविचार करायला भाग पाडू. पावसाळी अधिवेशनामध्ये या विषयावर ‘लक्षवेधी प्रश्न’ही उपस्थित करू.
- आमदार प्रकाश आबिटकर
सात-बारा आॅनलाईनचे जिल्ह्याचे काम उत्कृष्टपणे झाले आहे. महिनाभर जिल्ह्यातील १२३६ गावांत चावडी वाचनाची मोहीम घेऊन लोकांना सात-बाराची खातरजमा करून काही त्रुटी असल्यास त्या निदर्शनास आणण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार आलेल्या त्रुटींनुसार त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. त्याबरोबर आॅनलाईन सात-बारातून ‘क्रमांक १५’चा पीक पाहणीच्या वगळलेल्या कॉलमबाबत निवेदने आली आहेत. त्यानुसार या निवेदनासह आपले मत नोंदवून आपण शासनाला प्रस्ताव पाठविणार आहे. - अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी
३१ जुलैपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
जिल्ह्यात आॅनलाईन सात-बारा तयार करण्याच्या प्रक्रियेला ४ वर्षांपूर्वी सुरुवात झाली. हे काम महिन्यांपूर्वीच पूर्ण करायचे होते, परंतु वेळोवळी सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी राहिल्याने त्याला वरचेवर मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. ३१ जुलैपर्यंत १०० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाचे आहे.
सॉफ्टवेअरमध्येही त्रुटी
१ आॅनलाईन सात-बाराच्या अद्ययावतीकरणासाठी शासनाने राज्यभर ‘एनएलआरएमपी’ हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या माध्यमातूनच सध्या काम सुरू आहे; परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने आॅनलाईन सात-बारामध्येही चुका झाल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.
२ या चुका दूर करण्यासाठी गतवर्षी तलाठ्यांना पर्यायी ‘इडिट’प्रणाली दिली. त्यानंतरही त्रुटी राहून चुका होतच राहिल्या. त्यामुळे पुन्हा दोन दिवसांपूर्वी ‘रि इडिट’ ही प्रणाली तलाठ्यांना देण्यात आली असून, त्या माध्यमातून त्रुटी दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे.