शिष्यवृत्तीच्या अनेक अर्जांमध्ये चुका
By admin | Published: February 14, 2017 03:40 AM2017-02-14T03:40:45+5:302017-02-14T03:40:45+5:30
अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे तब्बल १ लाख १० हजार ९०५ अर्जांमध्ये चुका आढळल्या आहेत.
अविनाश साबापुरे / यवतमाळ
अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे तब्बल १ लाख १० हजार ९०५ अर्जांमध्ये चुका आढळल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत या चुका दुरुस्त झाल्या नाहीत, तर हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित होतील.
अल्पसंख्यक विद्यार्थ्यांच्या खात्यात वार्षिक १ हजार रुपयांची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती जमा केली जाते. २०१६-१७ या शैक्षणिक सत्राच्या शिष्यवृत्तीकरिता ‘नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल’वर आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते, परंतु संबंधित शाळांनी एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने भरले. त्यामुळे अल्पसंख्यक शिक्षण संचालनालयाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना चुका दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
मागील वर्षी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना यंदा केवळ ‘नूतनीकरण’ अर्ज भरायचा आहे. मात्र, शिक्षकांनी अशाही विद्यार्थ्यांचे अर्ज ‘नवीन’ (फ्रेश) विद्यार्थी म्हणून भरले आहेत. विशेष म्हणजे, पोर्टलवर एकदा भरलेल्या माहितीत बदल करता येत नाही. शिवाय, अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांकही चुकलेले आहेत.
लाखो विद्यार्थ्यांच्या यादीतून असे चुकीचे अर्ज शोधून शाळेचा यू-डायस क्रमांक आणि शाळेचे नाव लिहायचे आहे. मागील शैक्षणिक सत्रातही अशाच तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले.