‘त्या’ बेपत्ता अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या , कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:16 AM2018-05-30T06:16:11+5:302018-05-30T06:16:11+5:30

तालुक्यातील वावेतर्फे निजामपूर येथील आठ वर्षीय दिया जाईलकर ही मुलगी दुकानातून पेप्सी आणायला गेली, ती परतलीच नाही

'The' missing 'of a missing minor girl, dead body found in a muddy condition | ‘त्या’ बेपत्ता अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या , कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

‘त्या’ बेपत्ता अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या , कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

माणगाव : तालुक्यातील वावेतर्फे निजामपूर येथील आठ वर्षीय दिया जाईलकर ही मुलगी दुकानातून पेप्सी आणायला गेली, ती परतलीच नाही. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील जयेंद्र यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवारी २८ मे रोजी रात्री ८ वाजता गावातील एका पडक्या घरात दियाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली.
माणगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. वावे व आसपासच्या गावात तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कोठेही सापडली नाही. चार दिवसांनी २८ मे रोजी रात्री गावात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना एका बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने, त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता, हातपाय व तोंड बांधलेल्या स्थितीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. अधिक तपासात
तो मृतदेह दियाचा असल्याचे निष्पन्न झाले.
आपल्या मुलीचा मृतदेह पाहताच आईवडिलांनी हंबरडा फोडला. वडिलांनी आपल्या डोक्यावर हत्याराने वार करून घेतले. त्यात ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांना माणगांव उपजिल्हा रुग्णालयात तातडीने औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर, मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री ९ वाजता माणगांव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. पंचनामा झाल्यावर रात्री १ वाजता दियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला होता.
घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यात सर्वत्र उमटले. माणगावात आरोपीचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. गोरेगांव शहरात आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला, तसेच माणगांव तालुक्यातील गोरेगांव, लोणेरे, माणगाव शहर, इंदापूर, निजामपूर आदी महत्त्वाच्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. दियाच्या मृतदेहावर मंगळवारी वावे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजकीय वैमनस्यातून हत्या?
स्थानिक उणेगांव ग्रामपंचायतीची निवडणूक २७ मे रोजी होती. या निवडणुकीत दियाची आई पंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आली. दिया मतदानाच्या दोन दिवस अगोदर बेपत्ता झाली होती. त्यानंतर, मतमोजणीच्या दिवशी दियाचा मृतदेह गावात सापडला. त्यामुळे ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: 'The' missing 'of a missing minor girl, dead body found in a muddy condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.