दहावी गुणपत्रिकेवरील नापास शेरा गायब
By admin | Published: August 31, 2016 05:23 AM2016-08-31T05:23:17+5:302016-08-31T05:23:17+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा या पुढील काळात वापरला जाणार नाही
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा या पुढील काळात वापरला जाणार नाही. राज्याच्या शिक्षण विभागाने या संदर्भात निर्णय घेतला असून राज्य मंडळाकडून निर्णयाची अंमलबजावणी जुलै-आॅगस्ट २०१६ च्या परीक्षेपासून तात्काळ केली जाणार आहे.
गुणपत्रिकेवर केवळ पास किंवा नापास असे दोनच शेरे दिले जात होते. तसेच एक किंवा दोन विषयात नापास होणारे विद्यार्थी एटीकेटी सुविधेचा लाभ घेऊन काही अटींवर अकरावीसाठी पात्र असतील, असाही उल्लेख गुणपत्रिकेवर केला जात नव्हता. मात्र, जुलै-आॅगस्ट २०१६ च्या पुरवणी परीक्षेच्या गुणपत्रिकेवर व व तिथन पुढे गुणपत्रिकेवर नापास शेरा वापरला जाणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले की, फेब्रुवारी/ मार्च २०१७ पासून परीक्षेस प्रविष्ठ होणारे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाल्यास गुणपत्रिकेवर नापास असा शेरा न देता, ‘एटीकेटीसह अकरावी प्रवेशास पात्र’ असा शेरा दिला जाईल. तीन किंवा त्या पेक्षा जास्त विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘पुरवणी परीक्षेस पात्र’असा शेरा तर सर्व विषयात उत्तीर्ण असल्यास उत्तीर्ण असाच शेरा राहील. जुलै- आॅगस्ट २०१६ च्या पुरवणी परीक्षेपासून तीन किंवा त्या पेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘केवळ कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र’असा शेरा देण्यात येईल. (प्रतिनिधी)