Mission Shakti: शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना राज ठाकरे यांनी मोदींना लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 03:30 PM2019-03-27T15:30:01+5:302019-03-27T15:33:43+5:30
उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राद्वारे लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रह उद्ध्वस्त करत आज भारताने अंतराळ क्षेत्रात मोठे यश मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत याची माहिती दिली होती.
मुंबई - उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राद्वारे लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रह उद्ध्वस्त करत आज भारताने अंतराळ क्षेत्रात मोठे यश मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत याची माहिती दिली. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मिशन शक्ती मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. पण शास्त्रज्ञांनी मिळवलेल्या यशाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना सांगण्याची काय गरज होती? असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज ट्विटरवर पोस्ट करून या मिशन शक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात की,"एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. त्याबद्दल वैज्ञानिकांचं नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज? वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे त्यांना सांगू द्या.त्यांना प्रसिद्धी मिळू द्या,''
#SpacePower#ASAT#PMAddressToNation@DRDO_Indiapic.twitter.com/JILw2DcVsb
— Raj Thackeray (@RajThackeray) March 27, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार असल्याचे वृत्त आल्यापासून देशात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्राच्या सहाय्याने उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे क्षेपणास्राच्या सहाय्याने उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती.
यावेळी मोदींनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले होते. भारतीय क्षेपणास्त्राच्या (A-SAT) मदतीने पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती' असं नाव देण्यात आलं होतं.