Ashadhi Vari : वारीत नसलो... तरी वारीतच आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 11:35 AM2024-07-07T11:35:56+5:302024-07-07T11:36:17+5:30
‘माऊली माऊली’चा गजर.... कपाळावर टिळा लावत एकदा तरी वारी करावी
मितेश घट्टे
पोलिस उपायुक्त (वाहतूक) मुंबई शहर
आयुष्यात एकदा तरी वारी करावी...‘माऊली माऊली ’चा गजर....कपाळावर वारकरी टिळा लावत... पायी चालत... अध्यात्माचा एक डोळे भरून येणारा अनुभव घ्यावा...याबाबतीत मी स्वतःला नशिबवान समजतो, कारण आतापावेतो जवळपास ९ वर्षे आषाढी वारीच्या बंदोबस्ताची जबाबदारी सांंभाळतानाच टाळ, मृदंगाच्या गजरात एक-एक पाऊल पंढरपूरच्या दिशेने टाकणारे वारकरी यांच्यातील अध्यात्माची जाणीव मी अनेकदा अनुभवली आहे.
आज मी लिहिता झालो...पण यंदा वारी चुकली, याची अस्वस्थता मनात कायम आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने ऊन-पावसाच्या खेळात दिवे घाटातून पुढे मार्गस्थ झाली. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीनेही पुणे शहराची वेस ओलांडत जिल्ह्यातील वातावरणात अध्यात्माचा....भक्तीचा आनंद पेरलाय.
मुंबईत नेमणूक असल्याने वारीचे हे दररोजचे चालणे... कीर्तनाचा आनंद घेणे... वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या निनादात बेभान होणे हे मला यंदा प्रत्यक्ष अनुभवायला मिळत नाही, हे एक आध्यात्मिक, साहित्यिक मनाचा माणूस म्हणून माझ्या डोळ्यांच्या कडा अलगद ओल्या करणारे आहे. शेवटी वर्दी घातलेल्या पोलिसातही माणुसकीची कळ असतेच ना...
कराडला नेमणूक असताना पहिल्यांदा वारी बंदोबस्ताची जबाबदारी मिळाली. वारीचा बंदोबस्त हा तसा इतर बंदोबस्तासारखा नसतो हे निश्चित... कारण वारकरी कधीच आपली शिस्त मोडत नाहीत. माऊली या नावाशिवाय ते कोणालाही हाक मारत नाहीत. वारी जिथे असते, तिथे भुकेलेल्यांना न मागता अन्नदान.. तर तहानलेल्या पाण्याची सोय अगदी सहज होते. कोणी आजारी पडले, तर त्याच्यावर अगदी मोफत उपचार करणारे माणसातील देवही नजरेत भरलेले आहेत. अगदी हाच अनुभव नऊ वर्षे घेतला. त्यातही तीन वर्षे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीच्या देहू ते पंढरपूर या संपूर्ण मार्गावरील बंदोबस्ताच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडण्याचे भाग्य लाभले. प्रत्येक मुक्काम... प्रत्येक गाव... त्या गावातील माणुसकी आणि वारकरी यांची सेवा करणारी माऊलींच्या रूपातील माणसं हे दृश्य वारीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पाहताना अक्षरशः डोळे भरून यायचे... आज वारी पंढपूरच्या दिशेने... विठ्ठलाच्या दर्शनाच्या आशेने निघाली आहे...
अगदीच व्यक्त व्हायचे म्हटले, तर गेल्या वर्षी वारीत जे अनुभवले ते आजही माझ्या मनात आहे. सध्या मी मुंबई पश्चिम उपनगरीय भागात बदली होऊन माझे कर्तव्य बजावत आहे. बदलीनंतर मला यंदा वारीत सहभागी होता आले नाही... पण देहाने अनुभवलेली अन् डोळ्यांनी पाहिलेली... मनाला संवेदनशील करणारी वारी माझ्या मनात आजही आहे. मी म्हटलं ना, आयुष्यात एकदा तरी वारी करावी... मी बंदोबस्ताच्या निमित्ताने का होईना तब्बल ९ वेळा प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेतला. वारीचे महत्त्व जाणून घेतले....वारकऱ्यांचे आशीर्वाद घेतले... त्यांनी प्रेमाने दिलेला प्रसादाचा वारंवार आस्वाद घेतला. माऊली.. माऊली.. जयघोषाचा गजर मनात साठविला अन् पंढरपूरपर्यंत वारी पोहोचल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे याची देही याची डोळा दर्शन घेता आले.
आज मी शरीराने वारीत सहभागी नसलो, तरी मनाने मी वारीतच आहे... टाळ, मृदंगाचा निनाद कानात घुमतोय... माऊली.. माऊली.. नामाचा गजर आणि कानडा विठुरायाच्या दर्शनाची आस मनात आहे...