महाराष्ट्र निवडणूक 2019 : असा असणार उद्धव ठाकरेंचा 'ए'-'बी' प्लॅन; शिवसेनेच्या आमदारानेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 04:21 PM2019-11-07T16:21:38+5:302019-11-07T16:26:59+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तर शेवटचा पर्याय असेलला 'सी' प्लॅन उद्धव ठाकरे हेच ठरवतील.
मुंबई : भाजप-शिवसेनामधील सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या राजकीय घडामोडींना सकाळपासून वेग आला असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सेना आमदारांची आज बैठक घेतली. त्यामुळे शिवसेनेची पुढची दिशा काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, उद्धव ठाकरे यांचा 'ए' आणि 'बी' प्लॅन काय असणार, याचा खुलासा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीवेळी सत्तार म्हणाले की, सत्तास्थापनेच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांच्याकडे ए,बी,सी असे सर्व पर्याय उपलब्ध तयार आहेत. तर 'ए' म्हणजे महायुतीत ठरल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्षासाठी भाजप-शिवसेनेचे मुख्यमंत्री असेल. तसे झाले नाही तर 'बी' प्लॅन तयार असून, त्याप्रमाणे दुसऱ्या पक्षासोबत जायचं का ? याचा निर्णय उद्धव ठाकरे हे घेतील.
तर शेवटचा पर्याय असेलला 'सी' प्लॅन उद्धव ठाकरे हेच ठरवतील. ते जे सांगतील त्याप्रमाणे शिवसेनेचे आमदार निर्णय घेतील. त्यांनी राजीनामे देण्याचे सांगितले तर देऊन टाकू. उद्धव ठाकरे यांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला तर आमची विरोधात बसण्याची तयारी आहे. तसेच इतर पक्षालासोबत घेऊन सत्ता बनवण्यासाठी सांगितले तर तसेही करू, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
पक्षाने मुंबईत दोन दिवस नाही दोन महिने थांबायला संगितले तर त्याचीही तयारी आहे. तर भाजपचा काय निर्णय आहे, याचा निर्णय दोन दिवसात होईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच असेही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.