अबू आझमींकडून औरंगजेबाचं समर्थन; "औरंगजेब रहमतुल्लाह अलैह, मी इतिहास वाचलाय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 03:46 PM2023-01-22T15:46:26+5:302023-01-22T15:46:57+5:30
आता या गोष्टी आणून त्यातून राजकीय फायदा घेण्याचं काम सुरू आहे असा आरोप आमदार अबू आझमींनी भाजपावर केला.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचा जितका आदर इतर समाज करतो त्याहून अधिक मुस्लीम समाज करतो. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात मुस्लिमांसाठी खूप काही केले. ४० टक्के मुस्लीम त्यांच्याजवळ होते. वकील, सुरक्षा रक्षक सर्व मुस्लीम होते. ही लढाई धर्माची नव्हती तर सत्तेची होती. राजा, महाराजांना धर्माशी देणेघेणे नव्हतं असं आमदार अबू आझमींनी म्हटलं आहे.
त्याचसोबत औरंगजेबाचं समर्थन करताना आझमी म्हणाले की, मी औरंगजेबाला रहमतुल्लाह अलैह म्हणतो. औरंगजेबाचा इतिहास मी वाचलाय, औरंगजेबाच्या फौजेत शिपाई हिंदू होता. औरंगजेबबाबत बनारसचा किस्सा यूट्यूबवर टाकला तर तुम्हाला दिसेल. एका पंडिताच्या मुलीवर औरंगजेबाच्या फौजेतील शिपाई वाईट नजर ठेवायचा जेव्हा या मुलीची तक्रार औरंगजेबाला प्राप्त झाली तेव्हा त्याने शिपायाचे दोन्ही हात हत्तीच्या पायाला बांधून फाडून टाकले. ही मुलगी हिंदू आहे तिचं रक्षण करणे माझे कर्तव्य आहे असं औरंगजेबाने म्हटलं असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत ज्या चबुतऱ्यावर औरंगजेबाने नमाज पठण केले त्याठिकाणी हिंदू बांधवांनी मशिद बांधली. आजही बनारसमध्ये ती मशिद आहे. औरंगजेबाने लिहिलेली चिठ्ठी आजही बनारस विद्यापीठात आहे. एका मंदिराला फंड द्या, त्याला नुकसान पोहचवू नका असं औरंगजेबाने सांगितले होते. आसाममध्ये मंदिरांसाठी औरंगजेबाने फंड दिला. औरंगजेबाने काय केले काय नाही केले हे १९४७ मध्ये सर्व गोष्टी संपल्या. आता या गोष्टी आणून त्यातून राजकीय फायदा घेण्याचं काम सुरू आहे असा आरोप आमदार अबू आझमींनीभाजपावर केला.
दरम्यान, टिपू सुलतानने इंग्रजांविरोधात लढाई लढली. हे इतिहासात सर्वकाही उपलब्ध आहे. काहीजण टिपू सुलतानला विरोध करतात. शिवीगाळ करतात त्याला मी विरोध केला म्हणून मला जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येतात. मारायचे असेल मारून टाका. मृत्यू वरच्याच्या हातात आहे ज्याने तुम्हाला जन्म दिला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना सुरक्षा असूनही हत्या झाली. माझी सिक्युरिटी कुठेय? मी सामान्य माणूस पण माझे तोंड बंद होणार नाही. मी सत्य बोलत राहीन. मी या देशात हिंदू-मुस्लीम एकत्र करतोय पण सरकार हिंदू-मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करून सत्तेत यायला बघतेय असंही आझमी म्हणाले.
जे व्हायचे ते होईल
मला याआधीही धमक्या आल्यात. २ जणांना अटक केली होती. अद्याप कुणी मला हात लावला नाही. पोलीस तपास सुरू आहे. सरकारने माझी सुरक्षा कमी केलीय. जे काही व्हायचे ते होईल. सरकारची मर्जी असेल तसे त्यांनी करावे. मी सरकारवर आरोप लावत नाही. जे लोक टेलिव्हिजनवरून हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करतात मी त्यांच्याविरोधात आहेत. हा देश संविधानावर चालतो अशी प्रतिक्रिया अबू आझमींनी व्यक्त केली.