दानवेंनी दगाफटका केल्यास राजीनामा : अनिल गोटे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 07:34 PM2018-11-19T19:34:33+5:302018-11-19T19:35:34+5:30
मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर आज रात्री बैठक
मुंबई : धुळ्याचे भाजपा आमदार अनिल गोटे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजीनामा देणार होते. मात्र, पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्र्यांनी भेट देत ते आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचा दावा केला होता. आज गोटे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असून या बैठकीत दगाफटका झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा गोटे यांनी दिला आहे.
धुळे महापालिकेची निवडणूक येत्या 9 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गोटे यांचे मंत्री सुभाष भामरे यांच्याशी वाद सुरु होते. यामुळे गोटे यांनी आक्षेप घेतलेला व राजीनामा देण्याची घोषणा केली होती. रविवारी गोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आपले आक्षेप मांडले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नसून, धुळे महापालिकेची निवडणूक गोटे यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच प्रदेशाध्यक्ष दानवे गोटे यांच्या समस्या सोडवतील असेही सांगितले होते.
यानुसार आमदार अनिल गोटे हे दानवेंच्या निवासस्थानी आज रात्री भेट घेणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत दगाफटका झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा गोटे यांनी दिला आहे.