'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 08:24 IST2024-10-05T08:23:36+5:302024-10-05T08:24:47+5:30
मागील ३८ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. - शिंदे.

'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांची भेट घेतली आहे. माढा विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह शिंदे एकतर तुतारीकडून लढतील किंवा अपक्ष निवडणूक लढतील, अशी स्पष्ट भूमिका आमदार बबनराव शिंदे यांनी मांडली.
पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार शिंदे पुढे म्हणाले, मागील ३८ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी उमेदवारांची मागणी केली आहे. शरद पवारांकडून उमेदवारी मिळाली तर ठीक, नाही तर रणजितसिंह शिंदे अपक्ष लढतील. त्यामुळे आता महायुतीचा प्रश्नच येत नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
धनराज शिंदे यांचा विषय आमच्यासाठी संपला
पुतणे धनराज शिंदे यांच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले, त्यांचा विषय आता आमच्यासाठी संपलेला आहे. कौटुंबिक विषय आता पूर्णपणे संपलेला आहे.
हर्षवर्धन पाटील अखेर शरद पवार गटात दाखल
हर्षवर्धन पाटील यांनी अखेर शुक्रवारी शरद पवार गटात प्रवेश केला. येथील दूधगंगा दूध संघाच्या सभागृहात कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रवेशाची घोषणा केली.
पक्षाध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे व कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेशाचा आग्रह धरला. यामुळे आपण व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. यापुढचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांना आहेत. त्यांचा निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.