ते बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळतायत; बच्चू कडू-मंगेश चिवटेंबाबत जरांगेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 10:34 PM2024-01-20T22:34:53+5:302024-01-20T23:07:57+5:30
सरकारकडून निर्णयांना विलंब होत असला तरी बच्चू कडू यांच्यासह मंगेश चिवटे हे प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil :मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचा प्रस्ताव अमाान्य करत मुंबईकडे कूच केली आहे. जोपर्यंत आमच्या मागणीप्रमाणे सरकार आरक्षण देत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मात्र मुंबईकडे कूच करण्याआधी सरकारच्या शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्याशी जरांगे पाटील यांनी प्रस्तावावर चर्चा केली होती. या चर्चेवेळी शिष्टमंडळातील बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांना जरांगे यांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. मात्र नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांची भूमिका मवाळ झालेली पाहायला मिळाली. "ते दोघेही बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळत आहेत," असं जरांगे पाटील म्हणाले.
राज्य सरकारला पुरेसा वेळ दिल्यानंतरही सरकारने आमच्या मनाप्रमाणे तोडगा काढला नाही, असा दावा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच आम्हाला मुंबईला येण्याची वेळ आली, असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. मात्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत, आता प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी सुरू आहे, असं उत्तर राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून करण्यात आलेल्या कामांची माहिती आंदोलनस्थळी मंगेश चिवटे हे देत होते. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा पारा चढला. तुम्ही फक्त सरकारची बाजू मांडणार असाल तर आमचं आणि तुमचं जमणार नाही, असं चिवटे यांना उद्देशून जरांगे पाटील म्हणाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी काल माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांचा सूर बदलेला पाहायला मिळाला. सरकारकडून निर्णयांना विलंब होत असला तरी बच्चू कडू यांच्यासह मंगेश चिवटे हे प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी असलेले मंगेश चिवटे हे आंदोलक आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जखमींच्या उपचारासाठी केलेल्या मदतीमुळे, तसेच आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळवून दिलेल्या आर्थिक मदतीमुळे मनोज जरांगे पाटील हे मंगेश चिवटे यांच्या सातत्याने संपर्कात होते. मात्र दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी त्याच मंगेश चिवटे यांच्याशी चर्चा करताना राग व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु आता जरांगे पाटील यांनी मवाळ भूमिका घेत मंगेश चिवटे आणि बच्चू कडू यांच्याविषयी सहानुभूती दर्शवली आहे.