'हिच माझी पंढरी, हे माझे विठोबा रखुमाई'; बच्चू कडू यांच्याकडून विशेष आषाढी एकादशी साजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 09:01 PM2022-07-10T21:01:36+5:302022-07-10T21:02:17+5:30
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांनी आज आषाढी एकादशी निमित्त मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल येथील आनंद निकेतन वृद्धाश्रम येथे भेट दिली आणि वृद्ध, अपंगांचे पाद्यपूजन करुन त्यांना कपडे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.
मुंबई : सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी आज विशेष पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली. आज आषाढीनिमित्त ते पुन्हा एकदा वृद्धांच्या सेवेत दिसून आले. आमदार बच्चू कडू यांनी आज आषाढी एकादशी निमित्त मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल येथील आनंद निकेतन वृद्धाश्रम येथे भेट दिली आणि वृद्ध, अपंगांचे पाद्यपूजन करुन त्यांना कपडे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.
यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी ट्विट करुन माहिती दिली. "हिच माझी पंढरी, हे माझे विठोबा रखुमाई" असे म्हणत आपली आषाढी इथेच साजरी झाली असल्याचे सांगितले. आज आषाढी एकादशीनिमीत्त मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल येथील आनंद निकेतन या वृद्धाश्रम येथे भेट दिली. आमच्यातर्फे आषाढी एकादशीनिमीत्त वृद्ध आणि अपंगाना कपडे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले, असे बच्चू कडू यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
हिच माझी पंढरी, हे माझे विठोबा रुकमाई...
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) July 10, 2022
आज आषाढी एकादशी निमीत्त मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल येथील आनंद निकेतन वृध्दाश्रम येथे भेट दिली. आमच्या तर्फे आषाढी निमीत्त वृध्द अपंगाना कपडे व जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. pic.twitter.com/SmLj06DGUo
दरम्यान, आमदार बच्चू कडू मागील काही दिवसांपासून आपल्या राजकीय भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घरठाव केल्यानंतर आता त्यांची नजर सामाजिक न्याय व अपंग कल्याण मंत्रालयावर आहे. गेल्या मंगळवारी झालेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी तसे संकेतही दिले होते.
कॅबिनेट मंत्री किंवा विशिष्ट खात्याचा आपण आग्रह धरला नसला तरी अपंगांच्या सेवेसाठी सामाजिक न्याय विभागाची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले होते. रुग्ण आणि अपंगांची सेवा हाच समाजकार्याचा पिंड असल्याने आपण राजकारणात आलो. सामाजिक न्याय विभागाची संधी मिळाल्यास जनसेवेचा हा रथ अधिक जोमाने हाकता येईल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला होता.