आमदार अपात्रता सुनावणी: शिंदेंना हटविण्यासाठी ठाकरेंनी वाट का पाहिली?; शिंदे गटाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 08:14 AM2023-12-03T08:14:01+5:302023-12-03T08:14:33+5:30

विधान भवनातील सलग सुनावणीच्या आठव्या दिवशीही पक्षप्रमुखपद आणि व्हिप यावर जेठमलानी यांनी प्रश्नांचा भडिमार  केला.

MLA disqualification hearing: Why did uddhav Thackeray wait to remove eknath Shinde?; Question of Shinde group | आमदार अपात्रता सुनावणी: शिंदेंना हटविण्यासाठी ठाकरेंनी वाट का पाहिली?; शिंदे गटाचा सवाल

आमदार अपात्रता सुनावणी: शिंदेंना हटविण्यासाठी ठाकरेंनी वाट का पाहिली?; शिंदे गटाचा सवाल

मुंबई - एकनाथ शिंदे व १५ आमदार यांच्याविरोधात अपात्रता याचिका २४ जून रोजीच दाखल झाली. मग एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ३० जूनपर्यंत वाट का पाहिली, असा सवाल शिंदे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी शनिवारी सुनील प्रभू यांच्या उलटतपासणीत केला. पक्षविरोधी कृत्य होऊ नये म्हणूनच विश्वासदर्शक ठरावावेळी पक्षादेश काढल्याचे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी नमूद केले.

विधान भवनातील सलग सुनावणीच्या आठव्या दिवशीही पक्षप्रमुखपद आणि व्हिप यावर जेठमलानी यांनी प्रश्नांचा भडिमार  केला. सुनील प्रभू आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यालयीन सचिव विजय जोशी यांची उलटतपासणी घेण्यात आली. ठाकरे गटाची सुनावणी आता पूर्ण झाली आहे. ७ डिसेंबरपासून नागपूरात शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून होईल.

एकनाथ शिंदेंचा विधिमंडळ डायरीतील ई-मेल सादर
एकनाथ शिंदे यांना ज्या मेलवरून पक्षादेश पाठवला तो मेलच खोटा असल्याचा दावा जेठमलानी यांच्याकडून करण्यात येत होता. अखेर विधिमंडळाची डायरी सादर करीत या डायरीत नमूद असलेला ई-मेल आणि ज्यावरून पक्षादेश पाठवला तो मेल एकच असल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले. या ई-मेलसंदर्भात ज्यांनी (एकनाथ शिंदे) तक्रार केली त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची हिंमत का दाखवली नाही, असा सवाल ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला.

४ जुलै, २०२२ चा व्हिप सर्वांनाच
सरकार स्थापनेनंतर ४ जुलै रोजी झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी सरकारविरोधी मतदान करण्याचा पक्षादेश प्रभू यांच्याकडून का काढण्यात आला, असा सवाल जेठमलानी यांनी केला. त्यावर काही आमदार पक्ष विरोधी मतदान करणार असल्याचे समजल्याने सर्वच आमदारांना हा व्हीप काढण्यात आला होता असे प्रभू यानी सांगितले.

हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह
शिवसेना पक्षाच्या विचारधारेत हिंदुत्वाचा समावेश होता का, असा सवाल जेठमलानी यांनी केला. त्यावर हो नक्की आहे असे उत्तर प्रभूंनी दिले. बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट नावाने ओळखले जाते, हे माहीत आहे का, या सवालावर हे सर्व जगाला माहीत असल्याचे प्रभू म्हणाले. 
शिवसेना राजकीय पक्ष किंवा शिवसेना पक्षप्रमुख यांनी हिंदुत्वाची भूमिका मवाळ घेण्याचा निर्णय घेतला होता का, असा सवाल जेठमलानी यांनी केला तेव्हा हे धादांत खोटे आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) कधीही हिंदुत्वाच्या विचारांपासून लांब जाऊ शकत नाही, असे प्रभू म्हणाले. तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा राजकीय पक्ष नसून राजकीय नेत्यांचा समूह आहे, असा दावा जेठमलानींनी केला असता तोही प्रभू यांनी फेटाळला.

 

Web Title: MLA disqualification hearing: Why did uddhav Thackeray wait to remove eknath Shinde?; Question of Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.