सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 05:35 AM2024-05-10T05:35:39+5:302024-05-10T05:36:00+5:30
सुरेशदादा जैन यांनी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला असून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला असून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले असून भविष्यात राष्ट्राच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या व जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते मार्गदर्शक भूमिकेत राहणार असल्याचे नमूद करीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून समस्त शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त केलेला आहे.
१९८० पासून सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते सलग ३४ वर्षे आमदार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रिपद दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या केलेल्या कार्याचा आढावा घेतला होता. ज्यामध्ये जळगाव शहराचा सर्वांगीण विकास, विशेषतः बीओटी तत्त्वावर बांधलेले संकुल, गोरगरिबांसाठी घरे आदी केलेल्या कामांमुळे ते प्रभावित झाले होते. त्यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला होता. ते जिल्हा बँक असो, दूध विकास, मिनी मंत्रालय असो वा साखर कारखाने असो. त्या काळामध्ये सहकार क्षेत्रात जिल्ह्याचे विकासाचे व्हिजन, शेतकरी व सामान्य जनता हे केंद्रबिंदू ठेवून त्यांनी काम केलेले होते.
२०१४ पासून प्रकृतीच्या कारणास्तव सुरेशदादा सक्रिय राजकारणातून बाहेर पडले होते. समाजातील नागरिक, व्यापारी व उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.