लवकरच आमदार ग्राम योजना!
By admin | Published: December 2, 2014 04:18 AM2014-12-02T04:18:33+5:302014-12-02T04:18:33+5:30
केंद्राच्या सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणे राज्यात ‘आमदार ग्राम योजना’ राबविण्याचे विचाराधीन आहे. तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेस पाठवणार
अहमदनगर : केंद्राच्या सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणे राज्यात ‘आमदार ग्राम योजना’ राबविण्याचे विचाराधीन आहे. तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेस पाठवणार असल्याची माहिती ग्रामविकास तथा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे दिली.
सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत हिवरेबाजार येथे झालेल्या सरपंचांच्या पहिल्या कार्यशाळेत बोलताना मुुंडे म्हणाल्या, केंद्राची योजना केवळ सोपस्कार नसून एक संस्कार आहे. गावातील सर्व घटकांनी एकत्र येऊन तळमळीने काम केले तर प्रत्येक गाव आदर्श होईल. कार्यकर्ते विकासकामांसाठी निधी नेतात. मात्र, १०० टक्के निधी खर्च करीत नाहीत. आता तसे होणार नाही. जो खर्च करणार त्यालाच निधी मिळणार. ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आदर्श गाव योजना राबविण्यात येत आहे. त्यात नियोजन, सातत्य, लोकसहभाग असेल तरच कोणतीही योजना १०० टक्के यशस्वी होईल. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हे दिवंगत
गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न मी पूर्ण करणार असल्याचे पंकजा यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार, समन्वयक श्रावण हार्डिकर यांनी मार्गदर्शन केले. आदर्श गाव योजनेत राजकारण आणू नका, लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, अशी सूचनाही त्यांनी केली. राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. लोक हरिनाम सप्ताहावर लाखो रुपये खर्च करतात. मात्र, गावात शौचालय बांधत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
> अशी आहे
आमदार ग्राम योजना़़़
प्रत्येक आमदाराने मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावा, असे अपेक्षित आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना या माध्यमातून राबविण्यात येतील.
> जलयुक्त शिवार अभियान
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत राज्यातील प्रत्येक गावात पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबवून पाण्याचे नियोजन करण्यात येईल.