'...ही आग लांबपर्यंत जाणार, धनुष्यबाण आमचाच'; गुलाबराव पाटील यांचं बेधडक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 04:22 PM2022-07-06T16:22:43+5:302022-07-06T16:36:57+5:30
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आता रोखठोकपणे महाविकास आघाडी विरोधात विधान करू लागले आहेत. तसंच उद्धव ठाकरेंबाबतही आमदार आता उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.
मुंबई-
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आता रोखठोकपणे महाविकास आघाडी विरोधात विधान करू लागले आहेत. तसंच उद्धव ठाकरेंबाबतही आमदार आता उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळख असलेले आमदार गुलाबराव पाटील यांनी विधानसभेतच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेबाबत सूचक विधान केलं आहे.
"लग्न कुणाशी आणि लव्ह मॅरेज कुणाशी अशी परिस्थिती सरकारमध्ये होती. त्यामुळे राजकारणामध्ये आम्ही काही भाजपामध्ये गेलेलो नाही. आम्ही शिवसेना म्हणून उभे आहोत. शिवसेनेचे २२ माजी आमदार आणि १२ खासदार आता आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अजूनही तंबू सांभाळला पाहिजे असं मला वाटतं", असं स्पष्ट मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.
VIDEO: धनुष्यबाण आमचाच! गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले pic.twitter.com/9pUVi4vDRe
— Lokmat (@lokmat) July 6, 2022
"ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं. त्या भुजबळांबरोबर आम्ही सत्तेत बसलो यापेक्षा मोठी घटना होऊ शकत नाही. कारण आमच्या नेत्यांच्या मताचं आम्ही पालन करत होतो. आज शिवसेनेचे २२ आमदार आणि १२ विद्यमान खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ही आग आता लांबपर्यंत जाणार आहे. शिवसेना वाचवणारी ही आग आहे. आम्ही उठाव केला आहे. बंडखोरी नाही. धनुष्यबाण आमचाच राहणार", असं गुलाबराव पाटील म्हणाले.
आमचा बाप बाळासाहेबच
"माध्यमांनीच माझ्या जुन्या व्हिडिओच्या क्लिप दाखवल्या. बाप बदलल्याच्या. पण आमचा बाप अजूनही बाळासाहेबच आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. त्यामुळे आम्ही गद्दार नाही. आम्ही उलट शिवसेना वाचविण्याचं काम करत आहोत", असंही गुलाबराव म्हणाले.