आमदार जाधवांची टॅक्टर फॅक्टरची खेळी विधानसभेत त्यांच्याच अंगलट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 04:09 PM2019-07-08T16:09:39+5:302019-07-08T16:25:03+5:30
खैरे यांच्या पराभवाचे कारण ठरलेले जाधव यांना पराभूत करण्यासाठी खैरे हे कन्नड मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. औरंगाबादेत लोकसभा निवडणुकीत सर्वधिक चर्चेत असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव सुद्धा कन्नड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत जाधव यांना टॅक्टर फॅक्टरचा झालेला फायदा विधानसभेत अडचणीचा ठरू शकतो अशी चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ६२७ मते मिळाली होती. तर कन्नड मतदारसंघातून त्यांना ६९ हजार २४७ मते मिळाली होती. त्याच ठिकाणी खैरेंना ७४ हजार मते मिळाली होती. त्यामुळे जाधव यांची चिंता त्याच वेळी वाढली होती. तालुक्यातील जातीय समीकरण पहिले तर, जाधव यांनी ज्याप्रमाणे लोकसभेत मराठा समाजाला आपल्याकडे केले आहेत. त्याचप्रमाणे त्यावेळी ओबीसी, मुस्लीम, दलित समाज त्यांच्यापासून दुरावला होता. या मुळेच जलील यांना लोकसभेत कन्नडमधून ३४ हजार मते मिळाली होती. त्यामुळे लोकसभेत जाधव यांना टॅक्टर फॅक्टरचा झालेला फायदा विधानसभेत अडचणीचा ठरू शकतो अशी चर्चा आहे.
कन्नड मतदारसंघात आजही शिवसेनेची चांगली पकड आहे, आणि लोकसभेत ते दिसूनही आले. त्यात खैरे यांच्या पराभवाचे कारण ठरलेले जाधव यांना पराभूत करण्यासाठी खैरे हे कन्नड मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे. त्यातच अलीकडे जाधव यांनी शेतकऱ्यांना विमा मिळत नसल्याने, केलेल्या आंदोलनाला हवा तसा प्रतिसाद पहायला मिळाला नसल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक जाधवांना अडचणीची जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
जाधवांच्या गडात वंचितची खेळी
लोकसभेत मुस्लीम आणि दलित समाज एकत्र आल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे विधानसभेत सुद्धा तीच परिस्थिती राहील असा अंदाज वंचित कडून लावला जात आहे. मात्र तेवढ्यात उमेदवार विजय होणार नाहीत, त्यामुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या बंजारा समाजातून उमेदवार देण्याची खेळी वंचित कडून सुरु आहे. त्यासाठी उमदेवाराची शोधाशोध सुरु असल्याचे ही पहायला मिळत आहे.