तिकीट न मिळाल्यास गप्प बसणार नाही: नारायण पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 03:40 PM2019-09-05T15:40:31+5:302019-09-05T15:41:36+5:30
बागल यांच्या प्रवेशाने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेत मोठ्याप्रमाणात इनकमिंग झाली आहे. तर करमाळ्याच्या रश्मी बागल यांच्यासह इतर नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता बागल यांच्या प्रवेशाने शिवसेनेचे आमदार नारायण पाटील आक्रमक होताना पाहायला मिळाले. रश्मी बागल आणि मी दोघेही तिकिटाच्या स्पर्धेत आहोत. आमच्यापैकी एकाला तिकीट मिळाले तर दुसरा गप्प बसणार नसल्याचा इशाराच आमदार पाटील यांनी दिला आहे.
नुकतेच सोलापूर जिल्ह्यातून बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल, माजी आमदार दिलीप माने, करमाळ्याच्या रश्मी बागल यांच्यासह इतर नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे इनकमिंग झालेल्या नेत्यांची व जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी बुधवारी सोलापुरात शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नारायण पाटील यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
बागल यांच्या प्रवेशाने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत. मी तिकीटाच्या स्पर्धेत आहे. मात्र तरीही बागल यांना उमेदवारी दिली तर मी गप्प बसणार नाही. तसेच मला उमेदवारी दिली तर त्या सुद्धा माघार घेणार नाहीत. त्यामुळे बंडखोरी निश्चित आहे. असल्याचा खुलासा आमदार पाटील यांनी यावेळी केला.
त्यामुळे आम्हाला दोघांनाही उमेदवारी न देता सावंत बंधूंपैकी कोणीही करमाळ्यातून लढावं. आम्ही एकदिलाने तुमचे काम करू. असा सल्ला सुद्धा यावेळी पाटील यांनी दिला. मात्र उद्धवसाहेब घेतील तो निर्णय सर्वाना मान्य करावा लागेल असा टोला पाटील यांना संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी यावेळी लगावला.