फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय म्हणणाऱ्या शिंदेंच्या नेत्याचा युटर्न; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:32 IST2024-12-24T12:29:56+5:302024-12-24T12:32:31+5:30

Narendra Bhondekar News: एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे आणि तो पूर्ण होईल असा विश्वास आहे. आमच्या मनात जो राग होता तो विषय आता संपला, असे सांगत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सबुरीची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.

mla narendra bhondekar u turn after resignation said eknath shinde assured us and we will wait | फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय म्हणणाऱ्या शिंदेंच्या नेत्याचा युटर्न; म्हणाले...

फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय म्हणणाऱ्या शिंदेंच्या नेत्याचा युटर्न; म्हणाले...

Narendra Bhondekar News: महायुतीच्या नव्या सरकारचा कारभार सुरू झाला असला तरी नाराजीचा सूर अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे महायुतीमधील अनेक आमदार नाराज झाले आहे. आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली जात आहे. नाराज नेते, आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न महायुतीतील वरिष्ठ नेते करताना पाहायला मिळत आहेत. यातच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होत आहे, असे म्हणणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने आता युटर्न घेत सबुरीची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. 

मंत्रि‍पदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्याने नाराज होत भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. पक्षात मागून आलेल्यांना न्याय मिळतो, परंतु आम्हाला नाही. मला भाजपातील पक्षप्रवेशासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता. मलाही ते नेते म्हणून आवडतात. परंतु माझ्यावर पक्षांतराचा काही लागू नये, म्हणून मी जुन्या शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पश्चातापाची वेळ आल्यासारखे वाटते. इथे शिवसेना काहीच नाही, आम्ही आमच्या ताकदीवर आहोत. एवढे मोठे पद असताना अशी परिस्थिती येते तेव्हा नक्कीच मनात तसं वाटतं. या सगळ्या गोष्टींवर भविष्यात मी परिस्थिती आल्यावर बोलेन, असा इशारा देऊन मंत्रिपद न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेता पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नरेंद्र भोंडेकर यांनी आता सबुरीची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जात आहे. 

काही दिवस थांबा, योग्य सन्मान आपल्याला निश्चित दिसेल

स्थानिक पालकमंत्री होईल, असा शब्द शिंदे यांनी दिला. स्थानिक पालकमंत्री व्हावा, हा मुद्दा आमचा नेहमी राहणार आहे. काही दिवस थांबा, योग्य सन्मान आपल्याला निश्चित दिसेल. जुन्या गोष्टी विसरायला पाहिजे. नवीन गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. जुन्या गोष्टी विसरायला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी बोलावून, योग्य तो सन्मान होईल असा शब्द दिला. आमच्या मनात जो राग होता तो विषय आता संपला. स्थानिक पालकमंत्री व्हावा, ही आमची इच्छा आहे. जोपर्यंत तो होत नाही तो आमचा मुद्दा राहणार आहे. येत्या कालावधीत नक्कीच जिल्ह्याचा पालकमंत्री होईल, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे आणि तो पूर्ण होईल असा विश्वास आहे. काही गोष्टी ज्या आतल्या आहेत, त्या आतच राहू द्यायला पाहिजे, असे भोंडेकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेकडून गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या तीन नेत्यांना यावेळी संधी देण्यात आलेली नाही. यात अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांचा समावेश आहे. त्यांच्याऐवजी संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक यांना संधी देण्यात आली आहे.
 

Web Title: mla narendra bhondekar u turn after resignation said eknath shinde assured us and we will wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.