"मी घाबरून बसलो तर लोकांनी कोणाच्या दारात बसायचं"; आमदार निलेश लंके करतायत दिवसरात्र रुग्णांची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:09 PM2021-04-27T22:09:40+5:302021-04-27T22:15:37+5:30
Coronavirus : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मोठ्या प्रमाणात माजवलाय हाहाकार
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारलं आहे. शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर असं त्यांनी या सेंटरला नाव दिलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही निलेश लंके यांनी लोकांसाठी कोविड सेंटर उभारलं होतं. "आपलं काय व्हायचं ते होऊ द्या. जर मी घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. माझी लोकं सुरक्षित असली पाहिजेत," असं म्हणत लंके हे दिवसरात्र कोरोनाबाधितांच्या सेवेत झटत आहेत. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असून तो त्यांचा कुटुंबप्रमुखही असतो, अशी भावना लंके यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लंके यांनी कोविड सेंटरची उभारणी केली होती. त्यानंतर त्यांनी उभापलेल्या शरद पवार आरोग्य कोविड सेंटरमुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असून ते स्वत: दिवसरात्र या ठिकाणी रुग्णांची संवा करत आहेत. सध्या लंके हे पुन्हा एकदा आपल्या कामामुळे चर्चेत आले आहे. पारनेर तालुक्याती भाळवणी या ठिकाणी लंके यांनी ११०० बेड्सचं कोविंड सेंटर सुरू केलं आहे. यामध्ये १०० बेड्स हे ऑक्सिजन बेड्स आहेत.
लंके यांच्या कामाचं कौतुक
आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात. याशिवाय या ठिकाणी असलेल्या लोकांना पौष्टीक आहारदेखील पुरवला जातो. तसंच दिवसातून दोन वेळा रुग्णांची तपासणीही केली जाते. त्यांच्यासाठी योग, काही सांस्कृतिक कार्यक्रमही याठिकाणी आवश्यक ती काळजी घेऊन राबवले जातात. लंके यांच्या या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांना मदतीचा ओघही सुरू झाला आहे. पहिल्या लाटेतही त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेल्या कोविड सेंटरची दखल शरद पवार यांनी घेतली होती.