काेराेना केंद्रातच मुक्काम ठाेकून आमदार नीलेश लंके यांची रुग्णसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:11:31+5:30
लंके यांनी २०२०च्या कोरोना लाटेत एक हजार रुग्णांना सामावून घेणारे कोविड सेंटर उभारले होते.
सुधीर लंके -
अहमदनगर : प्रत्येक कोरोना रुग्ण हेच माझे कुटुंब आहे. त्यामुळे आपण सध्या पूर्णवेळ कोरोना रुग्णांसोबत राहत असून, घरी रडत बसण्याचा हा काळ नाही, असे प्रतिपादन करीत पारनेर-नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
लंके यांनी २०२०च्या कोरोना लाटेत एक हजार रुग्णांना सामावून घेणारे कोविड सेंटर उभारले होते. त्याबद्दल ‘लोकमत’ने त्यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ हा अवॉर्ड देऊन गौरविले. यावर्षी त्यांनी भाळवणी येथे ‘शरद पवार आरोग्य मंदिर’ नावाने अकराशे बेडचे सेंटर उभारले आहे. त्यातील शंभर बेडवर ऑक्सिजनची सुविधा आहे. लंके यांनी स्वत: या सेंटरमध्ये मुक्काम ठोकला असून, रात्री-अपरात्री ते स्वत: डॉक्टरांसारखे रुग्णांजवळ जाऊन त्यांची देखभाल करत आहेत.
जिल्ह्यात साखर कारखानदार व शिक्षण सम्राट आहेत. त्यांनी कोविड सेंटर उभारण्यात रस दाखविला नाही. लंके यांच्या पाठीशी मात्र कुठलीही संस्था नसताना त्यांनी सेंटर उभारले. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मी हे सेंटर उभारण्याचे ठरविले व हजारो हात माझ्या मदतीला आले. परदेशांतूनही मदत आली. मुलांनी खाऊचे पैसे या केंद्रासाठी पाठविले. सुमारे दहा ट्रक धान्य, भाजीपाला, फळे अशी रसद मिळाली. आत्तापर्यंत बाविसशे रुग्ण बरे झाले.
केंद्रात रुग्णांचे मनोरंजन : कोरोना रुग्णांच्या मनातील भीती घालविणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे मी स्वत: न घाबरता रुग्णांजवळ जातो. रात्री दीड-दोन वाजताही रुग्णांना काही त्रास होत आहे का, यावर लक्ष ठेवतो. येथे वातावरण जाणीवपूर्वक आनंदी ठेवले आहे, असे नीलेश लंके यांनी सांगितले.