...अन् आमदार नितेश राणेंनी शब्द पाळला; सचिन सावंतला मिळाला जगण्याचा नवा आधार
By प्रविण मरगळे | Published: January 16, 2021 11:06 AM2021-01-16T11:06:56+5:302021-01-16T11:08:36+5:30
दीड वर्षांपूर्वी अपघातात कणकवली तालुक्यातील बावशी येथे सचिन सावंत या युवकाने अपघातात दोन्ही पाय गमावले
मुंबई - अपघातात दोन्ही पाय गमावल्याने अपंगत्व आलेल्या सचिन सावंत या तरुणाला जगणंही कठीण झालं होतं, आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने महागडा खर्च अशक्यच..अशा परिस्थितीत आमदार नितेश राणेंच्या रुपाने सचिनच्या आयुष्यात नवी उमेद पुन्हा निर्माण झाली, नितेश राणे यांच्या मदतीने कृत्रिम पाय मिळाल्याने आज सचिनला सर्वसामान्य जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळाले आणि नवे कृत्रिम पाय लागताच तो इतरांच्या आधाराविना चालू लागला. आमदार नितेश राणे यांनी यासाठी संपूर्ण आर्थिक भार उचलला आहे.
दीड वर्षांपूर्वी अपघातात कणकवली तालुक्यातील बावशी येथे सचिन सावंत या युवकाने अपघातात दोन्ही पाय गमावले, हा युवक ८ फेब्रुवारी २०२० रोजी आमदार नितेश राणे यांना कणकवली निवासस्थानी येऊन भेटला होता. मानसिकदृष्ट्या खचलेला आणि रिक्षातून पण उतरू शकत नसलेल्या सचिन सावंत यांची त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी रिक्षाजवळ जाऊन आस्थेने विचारपूस केली होती. त्यानंतर या तरूणाला मुंबईत बोलावून त्याच्या दोन्ही पायांवर उपचार करण्यात आले, सचिनला त्याच्या पायावर उभं करण्याच आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सचिन सावंत यांना मुंबईत बोलावून नानावटी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि पुढील उपचार सुरु झाले.
सचिन यांचा एक पाय अर्धा तुटलेला असून दुसऱ्या पायाच्या तळव्याला गंभीर मार लागलेला आहे. दोन्ही पाय निकामी असल्याने सचिन स्वतःच्या पायावर चालू शकत नाही. सचिनला त्याच्या पायावर उभे करायचे असेल तर कृत्रिम पाय बसवण्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार सचिन याला दोन्ही कृत्रिम पाय बसवण्यासाठी जर्मनीतील प्रसिद्ध अशा ओटोबॉक (Otto Bock) हेल्थकेअर कंपनीशी संपर्क करण्यात आला. ओटोबोक (Otto Bock) च्या मुंबईतील सेंटरमध्ये सचिन सावंत यांच्या दोन्ही पायांचे माप घेऊन दोन्ही कृत्रिम पायांची ऑर्डर जर्मनीच्या कंपनीला देण्यात आली. कृत्रिम पाय जर्मनीवरून आल्यानंतर ते सचिन सावंत यांना बसवण्यात आले. यानंतर सचिन सावंत आपल्या पायावर चालू लागले आहेत. अत्यंत खर्चिक असलेले हे कृत्रिम पाय बसवण्याचे तसेच इतर खर्च आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात आला असून यामुळे सचिन सावंत याला जगण्याची नवी उमेद दिली आहे.