‘आमदार परिचारक हाजीर हो’
By Admin | Published: February 28, 2017 04:50 AM2017-02-28T04:50:14+5:302017-02-28T04:50:14+5:30
लष्करातील जवान आणि त्यांच्या पत्नीबाबत अपमानास्पद केलेले वक्तव्य भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांना भोवले आहे.
मुंबई : लष्करातील जवान आणि त्यांच्या पत्नीबाबत अपमानास्पद केलेले वक्तव्य भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांना भोवले आहे. राज्य महिला आयोगाने त्याबाबत मंगळवारी कार्यालयात हजर राहून खुलासा करण्याची नोटीस बजाविली आहे.
गेल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रचारावेळी विधान परिषद सदस्य असलेल्या प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे भाजपा उमेदवारांचा प्रचार करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
राजकारणाची व्याख्या करताना त्यांनी सीमेवरील जवान, त्यांच्या पत्नीशी संबंधित खालच्या स्तरावरील विनोद केला होता. त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर परिचारक यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वक्तव्यामुळे महिला वर्गाचा अपमान झाला असल्याने राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजाविली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)