...अन् शिवरायांच्या वेषातील आमदारानं नेत्याला केला मुजरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:59 PM2018-11-22T13:59:18+5:302018-11-22T14:00:27+5:30
एकीकडे विधानसभेत आरक्षणावरून वातावरण तापले असताना आमदार प्रकाश गजभिये यांची वेषभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती.
मुंबई - राज्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आज विधिमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून आले होते. एकीकडे विधानसभेत आरक्षणावरून वातावरण तापले असताना प्रकाश गजभिये यांची वेषभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण केल्यानंतर गजभिये यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते टीकेचे लक्ष्य होऊ लागले आहेत.
त्याचे झाले असे की, नेहमीच विविध वेशभूषा करून विधिमंडळात येणाऱ्या गजभिये यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून विधिमंडळाच्या आवारात प्रवेश केला. त्या दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गजभिये यांनी राज्य सरकारला खरमरीत प्रश्नही विचारले. मात्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे विधिमंडळ परिसरात आगमन होताच आमदार महोदयांना आपण शिवरायांच्या वेशात आहोत, याचे भान राहिले नाही. त्यांनी त्याच वेशामध्ये रामराजे नाईक-निंबाळकरांना मुजरा केला. रामराजे नाईक-निंबाळकरही त्यांना अभिवादन करत पुढे निघून गेले. मात्र गजभिये यांच्या या कृतीमुळे तिथे उपस्थित असलेल्यांना धक्का बसला.
अनेक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून अनेक जण येतात. मात्र छत्रपतींची वेशभूषा केल्यानंतर संबंधित व्यक्तीने छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे वागणे अपेक्षित असते. मात्र नेमकी इथेच गजभिये यांच्याकडून चूक झाली. (छायाचित्र - सुशील कदम)