शिंदे गटाचा आमदारपुत्र फरार; गोरेगावमधील व्यावसायिकाचे अपहरण प्रकरण, साथीदारांना पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 08:17 AM2023-08-12T08:17:52+5:302023-08-12T08:18:17+5:30
वनराई पोलिसांनी गुरुवारी राज याचे तीन साथीदार मनोज मिश्रा, पुनित सिंग आणि चंदन सिंग या तिघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कथितपणे सुपारी घेऊन गोरेगावमधील म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांना बंदुकीच्या धाकात धमकावत, त्यांचे अपहरण करणाऱ्या मागाठाणेतील शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज याच्या तीन साथीदारांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज मात्र अद्याप फरार असून, गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध सुरू आहे.
वनराई पोलिसांनी गुरुवारी राज याचे तीन साथीदार मनोज मिश्रा, पुनित सिंग आणि चंदन सिंग या तिघांना अटक केली. या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा त्यांना १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. त्यात राजसह त्याचे १० ते १५ साथीदार दिसत आहेत. सिंग यांच्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी या प्रकरणी ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करत, विमानतळावरून पळण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तिघांचा गाशा गुंडाळला. या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नसून, आम्ही आरोपींचा शोध घेत असल्याचे वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी सांगितले.
सिंग यांची गोरेगाव येथे ‘ग्लोबल म्युझिक जंक्शन’ नावाची कंपनी आहे. या माध्यमातून ते कर्ज देण्याचे काम करतात. कंपनीने मिश्राच्या ‘अदिशक्ती’ नामक म्युझिक कंपनीला २०२१ मध्ये ८ कोटी रुपयांचे कर्ज दिले व यासाठी ५ वर्षांचे करारपत्र, तसेच ३ वर्षांचा लॉकिंग पीरियड ठेवला. करारानुसार सिंगना ५ वर्षांत ११ कोटी मिळणार होते. मात्र, मिश्राने ती रक्कम चॅनेल कंटेट बनविण्यासाठी न वापरता इतरत्र लावली आणि कंपनीला मिळणारा नफा कमी झाला, तसेच त्याने करार रद्द करण्यासाठीही दबाव टाकला. मिश्रा अधिक पैशांची मागणी करू लागला आणि ९ ऑगस्ट रोजी सिंग यांना प्रकाश सुर्वे यांच्या ऑफिसमध्ये फोन करून धमकावण्यात आले.