आमदार प्रणिती शिंदे अडचणीत; सोलापूरच्या न्यायालयाने काढले वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 01:10 PM2019-08-28T13:10:23+5:302019-08-28T16:29:57+5:30
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालून धक्काबुक्की केलेले प्रकरण; माजी आमदार प्रकाश यलगुलवारसह सात जणांना दोन दिवस जामीन वाढविला
सोलापूर : जिल्हा नियोजन बैठकीच्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करताना धक्काबुक्की करून पोलिसाला जखमी केल्याप्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याच्या तारखेला हजर न राहिल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे यांना मुख्य न्यायदंडाधिकाºयांनी जामिनपात्र वॉरंट बजावले आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयात हजर झालेल्या माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह सात जणांना सत्र न्यायालयाने आणखी दोन दिवस अंतरिम जामीन वाढवून दिला आहे.
जिल्हा नियोजन समितीची २ जानेवारी २0१८ रोजी बैठक होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी औषधोपचारावर झालेली दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करीत गाडी अडवून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांबरोबर कार्यकर्त्यांनी हमरीतुमरी करून ढकलाढकली केली. यात पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाला. या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासह आंदोलकांवर सदर बझार पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, केशव इंगळे, राहुल वर्धा, बशीर शेख, करीम शेख हे सात जण मुख्य न्यायदंडाधिकारी खेडेकर यांच्यासमोर हजर झाले. न्यायदंडाधिकाºयांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. त्यावर आरोपीच्या वकिलांनी अंतरिम जामिनावर युक्तिवाद करताना आरोपी माजी आमदार, बँकेचे चेअरमन आहेत असे निदर्शनाला आणले. त्यावर न्यायदंडाधिकाºयांनी आरोपींना २७ आॅगस्टपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. त्यावर रात्री उशिरा आरोपींना जामिनावर सोडण्यात आले. त्यावर आरोपींनी मंगळवारी अॅड. प्रवीण शेंडे, अॅड. अमित आळंगे, अॅड. भीमाशंकर कत्ते, अॅड. एस. एस. कालेकर यांच्यामार्फत मुख्य न्यायदंडाधिकाºयांच्या आदेशाविरूद्ध सत्र न्यायाधीश आवाड यांच्या न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल करून त्यावर न्यायाधीशांनी सरकारी वकिलांचे म्हणणे दाखल करण्यासाठी २९ आॅगस्टपर्यंत आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला.
अन् निघाले दोघांविरूद्ध वॉरंट
- खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल मुख्य न्यायदंडाधिकारी खेडेकर यांनी आमदार प्रणिती शिंदे व नगरसेवक चेतन नरोटे यांच्याविरूद्ध जामिनपात्र वॉरंट काढल्याचे अॅड. मिलींद थोबडे यांनी सांगितले. न्यायालयाच्या वॉरंटनुसार या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी लवकरच न्यायालयात अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले.