आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:14 AM2024-11-19T05:14:20+5:302024-11-19T05:15:58+5:30
मानेवरचा वार त्यांनी हातावर घेतल्याने हाताची नस कापली गेली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. प्रताप अडसड यांची भगिनी अर्चना रोठे (४५) यांच्यावर चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूहल्ला केला.
मानेवरचा वार त्यांनी हातावर घेतल्याने हाताची नस कापली गेली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. त्यांच्या वाहनाची समोरील काच फोडण्याचाही प्रयत्न झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर रात्रीच्या अंधारात पसार झाले.
अपक्ष उमेदवारावर गोळीबार
जळगाव : जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन शेख (५०, रा. शेरा चौक, तांबापुरा परिसर, जळगाव) यांच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी सोमवारी पहाटे गोळीबार केला. यावेळी तीन राउंड फायर करण्यात आले. या घटनेत शेख यांच्या घराच्या खिडकीची काच फुटली असून, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी काडतूसच्या दोन रिकाम्या पुंगळ्या सापडल्या.
पहाटे ३:५४ वाजता झाडली गोळी : पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे ३:४२ वाजता घराजवळ एक दुचाकी दिसत आहे. त्यानंतर पहाटे ३:५४ वाजता गोळी झाडण्यात आल्याचे फुटेजमध्ये दिसते.
प्रचाराची रिक्षा फोडली
धुळे ग्रामीण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राघवेंद्र उर्फ राम मनोहर पाटील यांच्या प्रचारार्थ लावलेल्या रिक्षाची काच फोडण्यात आली. तसेच बॅनर फाडून डिझेलच्या टाकीत चहा पावडर व साखर टाकल्याची घटना घडली. मोहाडी पोलिसांत कलम ४२७ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
वाहनावर दगडफेक; उमेदवार जखमी
गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : गंगापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रा. सुरेश सोनवणे हे सोमवारी धामोरी बुद्रुक येथून मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परतत असताना रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात सोनवणे जखमी झाले.