“उद्धव ठाकरे हे CM एकनाथ शिंदेंचे नेतृत्व मान्य करत PM मोदींना पाठिंबा देतील”; कुणाचा दावा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 03:48 PM2024-02-19T15:48:02+5:302024-02-19T15:51:50+5:30
Ravi Rana News: आगामी काळात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला जय महाराष्ट्र करतील, असा दावाही करण्यात आला आहे.
Ravi Rana News: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी केंद्र सरकार, भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने जहरी टीका करताना पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार असून, १८ जागांवर दावा केल्याचे सांगितले जात आहे. यातच आगामी काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारतील आणि पंतप्रधान मोदी यांनाही पाठिंबा देतील, असा दावा एका अपक्ष आमदाराने केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेते, पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. यात काँग्रेसचाही समावेश झाला असून, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अलीकडेच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसेच अनेक नेते भाजपासह महायुतीतील अन्य पक्षांच्या संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना अपक्ष आमदार रवी राणा यांनी यांनी मोठा दावा केला आहे.
अहंकारी उद्धव ठाकरे बेचैन झाले आहेत
रवी राणा म्हणाले की, येणाऱ्या काळात विश्वास वाटतो की, अहंकारी उद्धव ठाकरे बेचैन झाले आहेत. मोदींना कधी भेटतो, त्यांची माफी कधी मागतो आणि कधी त्यांना पाठिंबा देतो असे उद्धव ठाकरेंचे झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर त्यांना पडला होता. आता मातोश्रीवर त्याचे चिंतन सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांच्या माध्यमांतून भाजपाशी संपर्क करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत, असा दावा रवी राणा यांनी केला.
महाविकास आघाडीलाही जय महाराष्ट्र करतील
पुढे बोलताना रवी राणा यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. काँग्रेसह त्यांनी जी आघाडी केली आहे, राष्ट्रवादीसह जी आघाडी केली आहे त्यांना जय महाराष्ट्र करतील, असा आणखी एक दावा रवी राणा यांनी केला आहे.