ठाकरे गटाला मिळालेले नाव उद्धव कॉंग्रेस सेना; आमदार रवी राणांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 11:39 AM2022-10-11T11:39:04+5:302022-10-11T11:41:18+5:30
शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना शिवसेना नावही तात्पुरते न वापरण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई: शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना शिवसेना नावही तात्पुरते न वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नवी नावे दिली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिले आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खरी शिवसेना नाही. एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यांची सेना ही उद्धव काँग्रेस सेना आहे, असा टोला आमदार रवी राणा यांनी लगावला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप विजय मिळवेल, असंही आमदार रवी राणा म्हणाले.
"आमच्याकडे प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचे नाव, दुसऱ्यांकडे अगोदर मी नंतर बाळासाहेब"
"आमच्याकडे प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचे नाव : शितल म्हात्रे
शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मैदान गाजवले. त्यानंतर, शिंदे गटाकडून शितल म्हात्रे यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केला. तसेच, शिवसेनेकडून होणाऱ्या टिकेला शिंदे गटाच्या प्रवक्त्त्या बनून शितल म्हात्रे प्रत्युत्तर देत आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतरही त्यांनी ट्विट करुन भूमिका मांडली होती. आता, शिवसेना आणि शिंदे गटाला दिलेल्या नावारुन त्यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह भविष्यात आम्हालाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे गटाला मिळाले आहे. त्यावरुन, म्हात्रे यांनी शिवसेनेवर व्हिडिओच्या माध्यमातून टिका केली आहे.
शिवसैनिकांच्या मनातील नाव बाळासाहेबांची शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळालं असून ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. आमच्या नावामध्ये प्रथम बाळासाहेब नंतर पक्षाचं नाव आहे. बाकीच्यांना जे मिळालंय त्यात प्रथम मी नंतर बाळासाहेब.. लोकांना याचा अर्थ कळत असेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्ही आमचं चिन्ह आयोगाकडे देऊ. मात्र, हे चिन्ह तात्पुरतं असेल, भविष्यात धनुष्यबाण हेच चिन्ह आम्हाला मेरीटवर मिळेल, असा विश्वासही शितल म्हात्रे यांनी व्यक्त केला.