अन्यथा दिसाल तिथेच मार खाल; आमदार रवी राणांचा कामचुकार कंत्राटदाराला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 11:24 AM2019-06-08T11:24:30+5:302019-06-08T11:52:17+5:30
रेल्वेच्या हद्दीतील काम वगळता कंत्राटदाराने आपले काम अर्धवट सोडून बंद ठेवल्याचे निदर्शनास आल्याने राणा यांनी कंत्राटदाराचा चांगलाच समाचार घेतला.
मुंबई - मतदार संघातील विकास कामांसाठी निधी आणून ही, कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे कामे रेंगाळत असल्याचे दिसून येताच बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा हे कंत्राटदारावर चांगलेच भडकले. एवढच नव्हे तर, उद्यापासून योग्य पद्धतीने कामे सुरू झाले पाहिजे, अन्यथा तुम्ही जिथे दिसाल त्याच ठिकाणी मार खाल, असा, इशारा राणा यांनी संबंधित कंत्राटदारास दिला.
राजपेठ येथून बडनेरा आणि दस्तुर नगरच्या दिशेने रेल्वेरुळावरून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यातील एका बाजूचे काम झाले असून त्यावरून वाहतूक सुद्धा सुरु झाली आहे. मात्र, दस्तुरनागरकडे जाणाऱ्या दुसऱ्याबाजूचे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे. शुक्रवारी आमदार रवी राणा यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह राजपेठ रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या हद्दीतील काम वगळता कंत्राटदाराने आपले काम अर्धवट सोडून बंद ठेवल्याचे निदर्शनास आल्याने राणा यांनी कंत्राटदाराचा चांगलाच समाचार घेतला. कामे झाली नाहीत तर एवढ मारेल की नागपूर तर सोडा महाराष्ट्रात कुठेच काम करू शकणार नाही अशी तंबीच आमदार राणा यांनी दिली.
अन्यथा दिसाल तिथेच मार खाल; आमदार रवी राणांचा कामचुकार कंत्राटदाराला इशारा pic.twitter.com/YX5FXrm52r
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2019
कामावरील मजूर निवडणुकीमुळे गावाकडे गेल्याचे कारण, कंत्राटदार आशिष चाफेकर यांनी सांगताच राणा यांनी त्यांची खरडपट्टी काढली. निवडणूक होऊन एक महिना झाला. घर बांधायला चाळीस मजूर लागतात आणि तुम्ही पुलाचे काम चाळीस कामगारांच्या भरोशावर करत आहात. मी शासनाकडून निधी आणून दिला. रेल्वेची परवानगी आणून दिली आणि तुम्ही फालतू कारणे सांगता. मला उद्यापासून काम सुरू झालेले दिसले नाही तर मी, तुम्ही दिसले तिथे मारणे सुरू करेल असा दम आमदार राणा यांनी कंत्राटदाराला भरला.