“एकनाथ शिंदे राजकारणातील कर्ण, देवेंद्र फडणवीस अर्जुन”; सदाभाऊ खोतांचे कौतुकोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 11:36 AM2024-08-19T11:36:17+5:302024-08-19T11:36:46+5:30
Sadabhau Khot: देवेंद्र फडणवीसांनी दिलेले मराठा आरक्षण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घालवले. शरद पवार राज्याच्या राजकारणाततील शकुनीमामा आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
Sadabhau Khot: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लाडकी बहीण योजना अधिक प्रभावीपणे सरकारला राबवायची आहे, त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, सभा यांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेतील अपयशाचा वचपा काढण्याच्या इराद्याने महायुती कंबर कसून तयारीला लागली आहे. महायुतीतील नेते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. यातच एका सभेत बोलताना विधान परिषदेतील आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.
एका सभेला संबोधित करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्याच्या राजकारणातील कर्ण हे एकनाथ शिंदे तर अर्जुनाची भूमिका देवेंद्र फडणवीस बजावत आहेत. एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केले. देवेंद्र फडणवीसांच्या साथीने महायुतीचे पुन्हा सरकार आणले. राज्य कसे चालवावे, याचा दुरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी घेरले आहे. कारण देवेंद्र फडणवीसच आपल्याला टफ-फाइट देऊ शकतात, हे शरद पवार यांना कळले आहे. त्यामुळेच वेगवेगळी आंदोलने आतापर्यंत राज्यात उभी करण्यात आल्याचा मोठा दावा सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना केला.
शरद पवार शकुनीमामा
मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. पण यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आरक्षण मिळवून दिले. पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेले हे आरक्षण घालवले. या दोघांवर टीका झाली नाही , ती फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाली. कारण प्रस्थापितांना धक्का देण्याचे काम फडणवीस यांनी केले होते. शरद पवार महाराष्ट्रच्या राजकारणाततील शकुनीमामा आहेत, या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, महायुतीसाठी रविवारचा दिवस घडामोडींनी भरलेला होता. एकीकडे महायुतीत तणाव वाढेल अशी घटना रविवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे घडली आणि त्यावरून अजित पवार गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले, तर दुसरीकडे महायुतीचे तीनही प्रमुख नेते राज्यातील विविध भागात लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करताना दिसले.