यवतमाळमध्ये पूर अन् भाजप आमदाराचा गौतमीसोबत डान्स; Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:14 PM2024-09-04T17:14:38+5:302024-09-04T17:25:29+5:30
यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती असताना आमदार संदीप धुर्वे यांनी केला गौतमी पाटीलसोबत डान्स केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.
BJP MLA Sandeep Dhurve Dance : महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात पावसाने दडी मारलेली असताना मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हिंगोली, यवतमाळ, वाशिम, परभणी, नांदेडला मोठा फटका बसला. यवतामळमध्ये मुसळधार पावसाने सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपचे नेते आणि पदाधिकारी डान्सर गौतमी पाटीलच्या नाच गाण्यात दंग असल्याचे पाहायला मिळालं आहे. आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा गौतमी पाटीलसोबत ठेका धरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार संदीप धुर्वे यांच्या या व्हिडीओवरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अशातच उमरखेडमध्ये भाजप आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी मंगळवारी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा दहीहंडी महोत्सव आयोजित केला होता. या दहीहंडी महोत्सवात डान्सर गौतमी पाटीलने हजेरी लावली होती. मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.
गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमात गौतमीसोबत आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी मंचावर ठेका धरला. आमदार संदीप धुर्वे यांच्या तुफान डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही हा व्हिडीओ ट्वीट करुन निशाणा साधला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी नाचलो, अशी प्रतिक्रिया आमदार संदीप धुर्वे यांनी दिली आहे.
भाजप आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या'; विजय वडेट्टीवारांची टीका
"भाजपचे आमदार म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे. झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या - शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे," असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.