शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार संजय रामुलकरांनी चक्क धरणात घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 05:59 PM2021-06-21T17:59:34+5:302021-06-21T17:59:50+5:30
MLA Sanjay Ramulkar jumped into the Pentakli dam : आंदाेलनाची अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आमदार रायमुलकर यांनी धरणाच्या पाण्यात उडी घेतली़.
हिवरा आश्रम: पेनटाकळी प्रकल्पाचा कालव्यामुळे अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. कालव्यातून पाणी पाझरत असल्यामुळे त्यांच्या जमिनी वहिती होत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी करून ही संबधीत विभागाने त्याची दखल घेतली नाही़ त्यामुळे, संतप्त झालेल्या आमदार संजय रायमुलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांसह आंदाेलन सुरू केले़. या आंदाेलनाची अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आमदार रायमुलकर यांनी धरणाच्या पाण्यात उडी घेतली़. त्यामुळे, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली हाेती़. तरफ्यावर असलेल्या लाेकांनी आमदारांना वाचवले़.
एक महिन्याच्या आत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी सायंकाळी आपले आंदाेलन मागे घेतले़
पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे दुधा, रायपुर ,पेनटाकळी या शिवारात प्रकल्पातून पाणी पाझरत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत जमिनी नापिकी झाल्या आहेत. ठिकठिकाणी या कालव्याला भगदाड पडले आहेत. या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे झिरो ते अकरा किलोमीटर पर्यंतचा कालवा बंद करून पेनटाकळी प्रकल्पातून पाणी हे बंद नलिकेद्वारे नेण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीचा पाठपुरावा खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर हे वेळोवेळी करीत आहेत. मात्र, त्याकडे अधिकाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष हाेत आहे़ अधिकारी याची दखल घेत नसल्याने आ. रायमुलकर यांनी सोमवारी प्रकल्पाच्या पाण्यात बसून आंदोलन केले.
यंत्रणेची उडाली तारांबळ
सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आ. रायमुलकर हे प्रकल्पाच्या पाण्यात उतरले .मात्र या आंदोलनाची कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. यामुळे आ. रायमुलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतल्यानंतर सर्व यंत्रणेची तारांबळ उडाली. पेनटाकळी प्रकल्पाचा पाण्यात तरफ्यावर बसलेले रामा अत्तरकर व पोलीस कर्मचारी काशीकर यांनी त्यांना वाचविले. त्यानंतर त्या ठिकाणी दुपारी चार वाजता अधिकारी दाखल झाले.खासदार जाधव यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव,दिलीपबाप् देशमुख, कार्यकारी अभियंता राळेकर, तहसिलदार डा.संजय गरकल, सिध्देश्वर पवार, एकनाथ सास्ते यांचेसह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
पेनटाकळी प्रकल्पाचा कालव्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात. अन्यथा यापुढे शेतकऱ्यांसह स्वतःच्या कुटुंबासोबत पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात आंदोलन करण्यात येईल.
आ. डॉ. संजय रायमुलकर.मेहकर