भास्कर जाधव, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे यांचा डोंबाऱ्याचा खेळ; शिंदे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 04:21 PM2023-02-07T16:21:47+5:302023-02-07T16:22:51+5:30

राजकारणात एक निवडणूक जिंकली म्हणजे आपण सर्वकाही जिंकलं असे त्यांना वाटते. आम्ही अनेक निवडणुका जिंकल्यात तरी आमच्यात हा अहंकार आला नाही असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.

MLA Sanjay Shirsat criticized Aditya Thackeray, Bhaskar Jadhav, Sushma Andhare | भास्कर जाधव, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे यांचा डोंबाऱ्याचा खेळ; शिंदे गटाची टीका

भास्कर जाधव, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे यांचा डोंबाऱ्याचा खेळ; शिंदे गटाची टीका

googlenewsNext

मुंबई - आदित्य ठाकरेंच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसलंय, त्यांचा अहंकार एवढा वाढलाय, आमदार गेले, सत्ता गेली, पक्ष संपत चालला तरी अहंकार संपत नाही. अहंकार वाढवण्यामागे जी भूमिका आहे ती संजय राऊत पेट्रोल टाकून वटवतायेत. आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. राजकारणाची सुरुवात दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन चढलेली पहिली पायरी होती अशा शब्दात शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. 

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, वरळी हा त्यांचा मतदारसंघ नाही. सचिन अहिर, सुनील शिंदे यांच्या छाताडावर पाय ठेऊन ते पहिली पायरी चढलेत हे ते विसरलेत. म्हणून त्यांच्या आव्हानाला महत्त्व देण्याचं कारण नाही. राजकारणात एक निवडणूक जिंकली म्हणजे आपण सर्वकाही जिंकलं असे त्यांना वाटते. आम्ही अनेक निवडणुका जिंकल्यात तरी आमच्यात हा अहंकार आला नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत आज ज्या सभा सुरू आहेत त्या डोंबाऱ्याचा खेळ आहे. त्या रस्सीवरचे पात्र बदलतात. कधी भास्कर जाधव, कधी सुषमा अंधारे तर कधी आदित्य ठाकरे, रस्सीवर उड्या मारतात आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या तर आपल्याला फार दाद देतात असं त्यांना वाटते. हे काही दिवस चालणारे नाटक आहे. हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते गप्प बसतील असा टोलाही आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना लगावला आहे. 

महाविकास आघाडी राहणार नाही
महाविकास आघाडीत सगळे आमच्याविरोधात जोरात लढणारे आहेत. काँग्रेसमध्ये फूट पडलीय. आघाडी कशी चालेल हे उद्धव ठाकरे, शरद पवार पाहतील. संजय राऊतचे फॉर्म्युले चालत नाही. त्याला शिवसेना फोडायची होती त्यात राऊताला यश आले. राऊतांमुळे आघाडी बिघाडी चालणार नाही. भविष्यात कुठलीही आघाडी राहणार नाही. सगळे स्वतंत्र लढतील आणि आमचीच सत्ता राहील असा विश्वास एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. 

Web Title: MLA Sanjay Shirsat criticized Aditya Thackeray, Bhaskar Jadhav, Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.