"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:39 AM2024-10-22T10:39:55+5:302024-10-22T10:51:03+5:30
खेड-शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटींची रोकड सापडल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाष्य केलं आहे.
Khed Shivapur 5 Cr Cash Seized : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या बैठका सुरु असतानाच खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी गाडीतून सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांना खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ एका कारमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. राऊतांनी केलेल्या टीकेला आता शहाजीबापूंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सोमवारी रात्री तपासणीदरम्यान, खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी गाडीत सोमवारी रात्री ५ कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही गाडी एका शिंदे गटाच्या आमदाराच्या जवळच्या व्यक्तीची असल्याची चर्चा सुरु झाली होती. चौकशी दरम्यान ही कार अमोल शहाजीराव नलावडे यांच्या मालकीची असून ही गाडी एका बांधकाम व्यावसायिकाकडे असल्याची माहिती पुढे आली आहे. या कारमधून चारजण ही पाच कोटींची रोख रक्कम घेऊन जात होते. पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
MH 45 AS 2526 क्रमांकाच्या या इनोव्हा कारमध्ये ही रक्कम सापडली आहे. ही कार आपण पूर्वीच विकल्याची माहिती कारचे कागदोपत्री मालक असलेल्या अमोल नलावडे यांनी दिली. जून महिन्यात आपण ही गाडी बाळासाहेब आसबे नावाच्या विकल्याचे अमोल नलावडेंनी म्हटलं. गाडीच्या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या प्रकरणात आपलं नाव आलं आहे आणि या रोख रकमेशी आपला संबंध नसल्याचा नलवडे यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला. मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड-शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी सापडले! (प्रत्यक्षात ५ कोटी रुपये) हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटींचा हा पहिला हप्ता! काय बापू... किती हे खोके?", अशी पोस्ट संजय राऊतांनी केली आहे.
संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. "माझं यात कुठेही नाव आलेलं नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. त्या तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. पण ती गाडी कोणाची याबद्दल मला काहीही कल्पना नाही. अमोल नलावडे हा शेकापचा कार्यकर्ता आहे. त्याचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी होते. गेल्या दोन वर्षांपासून तो माझ्यासोबत शिवसेनेचे काम करत आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यात नेमकं काय हे मला माहिती नाही. संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत. याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही," असं शहाजीबापू पाटील यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना म्हटलं आहे.