आमदार सुनिल राऊत शिंदे गटात सामील होणार..? संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 09:20 PM2022-06-26T21:20:36+5:302022-06-26T21:30:08+5:30
Maharashtra Political Crisis: संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा होत आहे.
Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान, संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, "माझे कुटुंब मेले तरी चालेल पण मी शिवसेनेसोबत बेईमानी करणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना आमचा श्वास आहे. बोलणारे बोलू देत, जास्तीत जास्त काय होईल सत्ता, खासदारकी जाईल पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत आहोत असे संजय राऊत म्हणाले आहेत," अशी स्पष्टोक्ती संजय राऊतांनी केली.
तसेच, सुनिल राऊत हे सध्या कांजूरमार्ग येथे सभा घेत असल्याचा खुलासा त्यांनी केला. दरम्यान, 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुनिल राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. पण, आता स्वतः संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
'त्यांचं पोस्टमार्टम विधानसभेत होईल'
दरम्यान, आज मुंबईतील पक्षाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली. ''गुवाहाटीत असलेले बंडखोर आमदार, हे मजा करतायत ते दिसतंय खात पित आहेत, उड्या मारत आहेत ती जिवंत प्रेत आहेत. त्यांचा आत्मा मेलेला आहे, त्यांची जीवंत प्रेत मुंबईत येतील, मग त्यांच्या पोस्टमार्टमसाठी विधानसभेत पाठवावे लागेल," असे राऊत म्हणाले.