'एकनाथ शिंदेंजी, तारीख, वेळ आणि किती बुलडोजर आणायचे सांगा'; भाजप आमदाराचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 21:25 IST2025-03-17T21:23:41+5:302025-03-17T21:25:15+5:30
भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात एक विधान केले.

'एकनाथ शिंदेंजी, तारीख, वेळ आणि किती बुलडोजर आणायचे सांगा'; भाजप आमदाराचे मोठे विधान
कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीने जोर धरला आहे. एकेरी उल्लेख टाळून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा बदल करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी कोल्हापूर ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला आहे. याची सुरूवात कोल्हापुरातून झाली असून, यावेळी बोलताना भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आमदार टी. राजा सिंह कोल्हापुरात बोलताना म्हणाले, "काल एकनाथ शिंदेंनी एक खूप चांगले विधान केले. ते म्हणाले, 'आम्ही तोडू औरंगजेबाची कबर.' तर एकनाथ शिंदेंनी मी विचारू इच्छितो की, शिंदेजी, तारीख सांगा, वेळ सांगा आणि हेही सांगा की आम्ही लोकांनी किती बुलडोजर सोबत आणायचे?"
"किती लाख कार्यकर्ते पाहिजे तेही सांगा. जी वेळ सांगाल, त्यावेळेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे लाखो मावळे, त्या जागी पोहोचतील. पण, आता बोलणं बंद झालं पाहिजे. आता बास्स झालं. आता औरंगजेबाची कबर काढली पाहिजे. औरंगजेबाचे नाव आणि निशाण महाराष्ट्रातूनच नाही, तर संपूर्ण भारतातून नष्ट झाले पाहिजेत", अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी मोदींना पत्र लिहावं - टी. राजा सिंह
"मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तातडीने एक पत्र पंतप्रधान मोदींना लिहा. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत त्याची कबर आहे. लाखो रुपये... आपल्या सगळ्यांच्या आयकरातून गेलेला पैसा त्या औरंगजेबाच्या कबरीच्या देखरेखीसाठी वापरला जात आहे", असे टी राजा म्हणाले.
शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलला -टी. राजा सिंह
आमदार टी. राजा सिंह यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याच्या मागणीवर जोर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, हा मोर्चा मुंबईमध्ये येण्यापूर्वी त्यांनी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.