आमदार ठाकूर शिवसेनेच्या व्यासपीठावर

By Admin | Published: June 7, 2017 03:49 AM2017-06-07T03:49:02+5:302017-06-07T03:49:02+5:30

अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.

MLA Thakur Shivsena's platform | आमदार ठाकूर शिवसेनेच्या व्यासपीठावर

आमदार ठाकूर शिवसेनेच्या व्यासपीठावर

googlenewsNext

शशी करपे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : स्वत:ची कामगार संघटना असतानाही वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांच्या बाजूने सरकारनेच नव्हे तर सर्व पक्षांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. असे आवाहन शिवसेनेच्या व्यासपीठावरून करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
बहुजन विकास आघाडीची स्वत:ची बहुजन कामगार संघटना आहे. वसई विरार महापालिकेसह वसई विरार आणि पालघर, बोईसर औद्योगिक वसाहतीत संघटना कार्यरत आहे. असे असताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई विरार महापालिकेत शिरकाव करीत असलेल्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावली. इतकेच नाही तर संघटनेच्या अग्निशमन दलातील फलकाचे अनावरणही केले. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडीक, जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर, माजी नगरसेवक वसंत वैती, विनायक निकम यांच्या उपस्थित पार पडलेल्या कार्यक्रमात भाषणही ठोकले. त्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.
सध्या वसई विरार महापालिकेत माजी आमदार आणि अद्यापही शिवसेनेचे उपनेते असलेल्या विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने आपले बस्तान बसवले आहे. महापालिकेच्या महत्वाच्या विभागात पंडितांच्या संघटनेने शिरकाव केला आहे. पंडितांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी सतत आंदोलने करून महापालिकेला जेरीस आणले आहे. आमदार ठाकूर यांची स्वत:ची बहुजन कामगार संघटना असली तरी महापालिकेत या संघटनेला आपला जम बसवता आलेला नाही. याउलट पंडितांच्या संघटनेचे बळ वाढताना दिसत आहे. महापालिकेत पंडितांच्या संघटनेला शह देण्यासाठी आमदार ठाकूरांनी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेला महापालिकेत प्रवेश दिला असल्याची जोरदार चर्चा सध्या महापालिका वर्तळात सुरु झाली आहे. महाडीक यांनीही महापालिकेतील इतर विभागातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीही भारतीय कामगार सेना पुढाकार घेईल, असे सांगितले.
राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर आमदार ठाकूर यांनी आपल्या तीन आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जाहिर पाठिंबा दिला होता. सध्या शिवसेना आणि भाजपमधील दरी वाढत चालली आहे. असे असताना आमदार ठाकूरांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शविली. तर सूर्यकांत महाडीक यांनी शेतकऱ्यांचा लढा चिघळल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. सरकारची जी चुकीचे धोरणे आहेत त्याला शिवसेनेचा विरोध राहणार आहे, असेही महाडीक यांनी सांगितले.

Web Title: MLA Thakur Shivsena's platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.