राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांची संजय राऊतांच्या विधानांवरून नाराजी!, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:23 AM2022-06-14T05:23:21+5:302022-06-14T05:54:54+5:30
राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली.
मुंबई :
राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली. निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानांबद्दल या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. राज्यसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधान परिषद निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खा. सुनील तटकरे आदी नेते उपस्थित होते.
राज्यसभेच्या निकालानंतर शिवसेना नेते राऊत यांनी केलेल्या विधानांवर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. राऊत यांच्या विधानांमुळे आमदारांमध्ये विशेषकरून सहयोगी समर्थक आमदारांत नाराजी आहे. राऊत यांनी थेट राष्ट्रवादीच्या जवळ असणाऱ्या आमदारांची नावे घेतली. त्याचा आगामी विधान परिषद निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली. अशा अनावश्यक विधानांमुळे सर्वच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांंमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले गेले.
- राज्यसभा निवडणुकीत खुल्या पद्धतीने मतदान असतानाही शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा फटका बसला. या महाविकास आघाडीचा पराभव आहे. संख्याबळ असतानाही असे निकाल लागले. विधान परिषदेसाठी मात्र गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामुळे अपक्ष आणि सहयोगी आमदारांसोबत समन्वय, संवाद राखण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला.