आमदार ब्लॅकमेलर, तर खासदार भ्रष्टाचारी; भाजपा नेत्यांमध्ये डबलबारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:09 AM2020-01-03T03:09:52+5:302020-01-03T06:59:42+5:30

विकासकामांवरुन जुंपली; मराठवाड्यातील भाजपच्या आमदार-खासदारांचे एकमेकांवर गंभीर आरोप

MLAs are blackmailers, while MPs are corrupt; Double-turn in BJP leaders | आमदार ब्लॅकमेलर, तर खासदार भ्रष्टाचारी; भाजपा नेत्यांमध्ये डबलबारी

आमदार ब्लॅकमेलर, तर खासदार भ्रष्टाचारी; भाजपा नेत्यांमध्ये डबलबारी

Next

मुंबई : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी एकमेकांवर ब्लॅकमेलिंग आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप-प्रत्यारोप केले आहे. भाजपमधील या दोन लोकप्रतिनिधींचे हे भांडण चव्हाट्यावर आले आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळ्यांबद्दल सातत्याने लेखी तक्रारी आ. प्रशांत बंब करत असतात. मराठवाड्याच्या विविध भागातील बांधकामांमध्ये कसकसा भ्रष्टाचार झाला याच्या तक्रारी त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकदा केलेल्या आहेत. गाजलेल्या डांबर घोटाळ्यातील त्यांच्या तक्रारींची चौकशी विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने करून संबंधित अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला होता. या घोटाळ्यात अनेकांवर कारवाईदेखील झाली.

प्रशांत बंब यांनी काही महिन्यांपूर्वी नांदेड जिल्ह्याच्या लोहा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामांकडे मोर्चा वळविला. काही रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांकडे रस्त्यांच्या नावांनिशी केली होती. याशिवाय, आयटीआय इमारत, लोहा आदी कामांमध्येही घोटाळे झाल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. प्रताप पाटील चिखलीकर हे लोहाचे आमदार होते. २०१४ मध्ये शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेलेले चिखलीकर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून भाजपतर्फे लढले आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता.

लोहा मतदारसंघातील कामांची तक्रार बंब यांनी केल्यानंतर गेल्या महिन्यात चिखलीकर यांनीही प्रधान सचिवांना एक पत्र पाठविले. तक्रारीतील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तक्रारकर्ते बंब हे ब्लॅकमेलर आहेत. त्यांचा या कामाशी संबंध नाही पण असेच अडथळे आणून ब्लॅकमेल करण्याचे त्यांचे तंत्र आहे. तक्रारीअंती ठेकेदारांशी ते तडजोड करतात, असे चिखलीकर यांनी पत्रात म्हटले आहे.
प्रशांत बंब यांनी चिखलीकरांच्या या पत्रावर प्रधान सचिवांना दोन दिवसांपूर्वी पत्र पाठविले. तसेच चिखलीकरांनाही चारपानी पत्र पाठविले आहे. मी माझ्या तक्रारीत जे मुद्दे उपस्थित केले होते त्याची दखल घेऊन आपणच पोलीस ठाण्यात वा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देणे मला अपेक्षित होते पण आपण तसे न केल्याने भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदार यांच्याशी आपण हातमिळवणी करीत असल्याचा दाट संशय येतो. मी केलेल्या तक्रारीत तथ्य नाही असे आपल्याला वाटत असेल तर आपण माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, माझी तक्रार भाजपच्या श्रेष्ठींकडे करा, असे आव्हान बंब यांनी दिले आहे. काही विशिष्ट ठेकेदारांना वाचविण्याचा प्रयत्न चिखलीकर करीत असल्याचा आरोपही केला आहे. माझे आरोप खोटे असल्याचे चिखलीकर यांनी सिद्ध करावेत, मी पुराव्यानिशी आरोप केले असून चिखलीकर यांनीही पुरावे देऊन आरोप खोडावेत, असे आव्हानदेखील बंब यांनी दिले आहे.

खा. चिखलीकर, आ. बंब आमने सामने
प्रशांत बंब यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघाकडे किंवा फार तर औरंगाबाद जिल्ह्याकडे पाहावे. त्यांनी नांदेड जिल्ह्यात दखल देण्याची गरज नाही. ते आमच्याच पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी मर्यादा सांभाळणे अपेक्षित आहे.
- खा. प्रताप पाटील-चिखलीकर.

मी एका विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी असलो तरी विधानसभा सदस्य या नात्याने राज्यातील कोणत्याही बाबीसंदर्भात बोलण्याचा मला अधिकार आहे. मी पुराव्यांनिशी आरोप केले आहेत, खा.चिखलीकर यांनी ते पुराव्यांनिशी खोडून दाखवावेत. - प्रशांत बंब, आमदार.

Web Title: MLAs are blackmailers, while MPs are corrupt; Double-turn in BJP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.