‘आमदार अगवा नही, तो भगवा हुए है’; मोहित कंबोज यांचं खोचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 02:43 PM2022-06-22T14:43:24+5:302022-06-22T14:43:33+5:30
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे.
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे मध्यरात्री आमदारांना विमानानं नेताना त्यांच्यासोबत भाजपचे नेते मोहित कंबोज आणि संजय कुटे हेदेखील दिसले होते. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी एक खोचक ट्वीट केलं आहे.
“विधायक अगवा नहीं हुए, भगवा हुए है! जय श्री राम,” असं ट्वीट मोहित कंबोज यांनी केलं आहे. तर दुसऱ्या ट्वीट मध्ये त्यांनी हर हर महादेव असं म्हटलंय. यापूर्वीही मोहित कंबोज हे आमदारांसह सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. आता ते आमदारांसह गुवाहाटी येथेदेखील पोहोचले असल्याचं समोर येत आहे. मोहित कंबोज, संजय कुटे आणि रविंद्र चव्हाण हे तिघेही सध्या गुवाहाटीमध्ये असून सूरतमध्येही आमदारांना ठेवण्यापासून गुवाहाटीला नेईपर्यंत सर्व जबाबदारी त्यांच्याकडेच होती असंही सूत्रांकडून सांगण्यात आलंय.
विधायक अगवा नहीं हुए, भगवा हुए है !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 22, 2022
जय श्री राम
काय आहे प्रकरण?
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात क्रॉस व्होटिंग झाल्याचं समोर येताच एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल झाल्याचं कळालं. त्यानंतर शिंदे हे समर्थक आमदारांसह गुजरातच्या सूरत येथील हॉटेलमध्ये असल्याचं आढळलं. त्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचं नाट्य सुरू झालं. भाजपासोबत सरकार स्थापन करावं, काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडा असा प्रस्ताव शिंदे आणि समर्थक आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या आमदारांनी शिवसेनेतच बंड पुकारलं त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसला. या सर्व घडामोडीत भाजपाकडून एकनाथ शिंदे आणि आमदारांना रसद पुरवली जात असल्याचंही समोर आले. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचा मोठा गट असल्याचा दावा केला जात आहे.