आमदार-खासदारांशी सौजन्याने वागण्याचे फर्मान
By admin | Published: July 16, 2015 12:11 AM2015-07-16T00:11:04+5:302015-07-16T00:11:04+5:30
कायद्यासमोर सर्व नागरिक समान असल्याचे राज्यघटनेत नमूद असले तरी आधुनिक राज्यकर्ते आणि त्यांच्या नेत्यांसाठी विशेष वागणूक देण्याचे फर्मान महाराष्ट्र सरकारने काढले आहे.
- जमीर काझी, मुंबई
कायद्यासमोर सर्व नागरिक समान असल्याचे राज्यघटनेत नमूद असले तरी आधुनिक राज्यकर्ते आणि त्यांच्या नेत्यांसाठी विशेष वागणूक देण्याचे फर्मान महाराष्ट्र सरकारने काढले आहे. त्यानुसार आमदार-खासदारांशी आदराने व सौजन्याने वागावे अन्यथा शिस्तभंगाचा बडगा उगारला जाईल, अशी सूचना राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जोरदार संघर्ष होण्याचे संकेत पहिल्या तीन दिवसांच्या कारभारावरून स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर हुज्जत घालणाऱ्या आमदारांना रोखण्यासाठी कडक धोरण राबविण्याची आवश्यकता असताना त्यांच्याशी सभ्यतेने वागण्याबाबतची सूचना महासंचालकांतर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) प्रभात कुमार यांना सोमवारी विशेष परिपत्रकानुसार केली. राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांनी ही बाब अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यास याद्वारे सुचविण्यात आले आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी विशेषत: पोलीस लोकप्रतिनिधींशी व्यवहार करताना सौजन्य व आदराची वागणूक देण्यात कुचराई करतात, असा आक्षेप विधानसभेच्या विशेषाधिकार समितीने नोंदविला होता. त्यामुळे आमदार-खासदारांना सन्मानाची वागणूक देण्याबाबत शासनाने स्वतंत्रपणे सूचना कराव्यात, असा विशेष ठराव विधानसभेत एकमताने केला. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याबाबत बजावले आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना रोखतानाही पोलिसांना त्यांच्याशी सौजन्याने वागावे लागणार आहे.
त्यांच्याकडून अपमानास्पद वर्तणूक झाल्यास किंवा त्याबाबत आक्षेप नोंदविल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तंभगाची कारवाई करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करायचे की आमदार-खासदारांची मर्जी सांभाळायची, असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
विधिमंडळांने मंजूर केलेल्या ठरावानुसार पोलिसांना ड्युटी बजावताना लोकप्रतिनिधींशी आदर व सौजन्याने वागावे लागणार आहे. त्यांच्याकडून याचे उल्लंघन झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.
- प्रभात कुमार, विशेष महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था)