आमदारांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली
By admin | Published: March 2, 2017 01:03 AM2017-03-02T01:03:26+5:302017-03-02T01:03:26+5:30
औरंगाबादचे पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी उमेदवारीसाठी पैसे घेऊन तसेच अन्य पक्षांशी संपर्क साधून वातावरण खराब केले
पुणे : महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाला चांगले वातावरण होते; मात्र औरंगाबादचे पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी उमेदवारीसाठी पैसे घेऊन तसेच अन्य पक्षांशी संपर्क साधून वातावरण खराब केले, असा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांनी केला. पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या आधी पक्षाच्या शहरातील कार्यकर्त्यांनी पक्षासाठी चांगले काम केले. वातावरणनिर्मिती झाली. त्याच वेळी शहराध्यक्ष या नात्याने आमदार जलील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी कधीही दखल घेतली नाही अशी टीका करून शेख म्हणाले, ‘‘त्यामुळे आम्ही शहर स्तरावर पक्षाची ३० ज्येष्ठ कार्यकर्त्यांची समिती नियुक्त केली. या समितीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. जलील त्यानंतर आले व त्यांनी थेट उमेदवारी देण्यास सुरुवात केली. शहराध्यक्ष म्हणून त्यांनी कधीही विश्वासात घेतले नाही.’’
वेगवेगळ्या प्रभागांमधील काही उमेदवारांनी फोन करून जलील यांनी उमेदवारीसाठी पैसे घेतले असल्याचे सांगितले असल्याचा आरोपही शेख यांनी केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते असदुद्दिन ओवेसी यांची सभा पुण्यात झाली. पक्ष कार्यालयात त्यांची भेट नियोजित केली होती; मात्र जलील यांनीच ती भेट होऊ दिली नाही. उमेदवारांचे एबी फॉर्मही त्यांनी मनाप्रमाणेच वाटले. अन्य पक्षातील काही उमेदवारांशी हातमिळवणी केली. पक्षाची येरवडा प्रभागात अश्विनी लांडगे ही एक जागा निवडून आली; मात्र त्यांच्या स्वबळावर ती निवडून आली आहे. आणखी किमान ५ उमेदवार निवडून आले असते; मात्र जलील यांनी वातावरण खराब केल्याने ते आले नाहीत. जलील यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी शेख यांनी केली.
(प्रतिनिधी)
एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी या आरोपांबाबत आपण पक्षश्रेष्ठींकडे खुलासा देऊ, असे सांगितले. तोपर्यंत आपण या विषयांवर काहीही बोलणार नाही, असे ते म्हणाले.