सरकार बदलले तरी मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे धोरण भाजपधार्जिणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:26 AM2020-02-27T03:26:05+5:302020-02-27T07:00:19+5:30
आघाडीमधील आमदारांची नाराजी
- अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी अधिकाऱ्यांची मानसिकता मात्र अजूनही भाजप आमदारांना मदत करणारी आहे, अशी तक्रार आघाडीच्या आमदारांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.
मंत्रालयातील अधिकारी आमची कामे करत नाहीत, मात्र भाजपच्या आमदारांची कामे आजही नाकारली जात नाहीत, असेही काही आमदारांनी सांगितले. रविंद्र वायकर, अरविंद सावंत यांच्या नेमणुकांचेही असेच झाले. सावंत यांना राजीनामा द्यायला किंवा हे पद घेण्यास नकार दर्शवणारे पत्र द्यायला सांगा असा मेसेज अतिवरिष्ठ अधिकाºयांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दिला. त्यावर नेमणुका करताना तुम्ही काय करत होता, त्यावेळी तुमच्या लक्षात आले नाही का? असे सवाल देसाई यांनी केले असता तो अधिकारी निरुत्तर झाला. शेवटी त्या दोघांच्या नेमणुका रद्द करण्याचे आदेश सरकारला काढावे लागले. आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री असताना ही नामुष्की ज्या अधिकाऱ्यांमुळे आली त्यांच्यावर कारवाईसुध्दा होत नाही, अशी नाराजी आमदारांनी बोलून दाखवली. एनआयएच्या बाबतीतही असेच घडले. ठरल्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या फाईलवर मत लिहून फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली पण मुख्यमंत्र्यांना वेगळीच माहिती देत फाईलवर सही घेतली गेली. गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना हे दाखवले तेव्हा हा प्रकार उघडकीस आल्याचे समजते.
पीए आणि पीएस बाबतही तक्रारी
भाजप मंत्र्यांकडे पीएस, पीए असणारे काही अधिकारी विद्यमान मंत्र्यांकडे आहेत. ते भाजप आमदारांना प्राधान्य देतात, अशी तक्रार आमदारांची आहे. अतिवरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ऐकतात. त्यांना बाकी कोणाचे नाही ऐकले तरी चालते अशीही त्यांची तक्रार आहे.